Friday, April 3, 2026

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य  जलवाहिन्यांचे  ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे जिओपॉलिमर अस्तराचे खंडकविरहित तंत्रज्ञानाद्वारे मजबुतीकरण करण्यात येत आहे. यामुळे ब्रिटिशकालीन असलेल्या या कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे आयुष्य किमान ५० वर्षांनी वाढणार आहे. तसेच पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढण्यासह अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा अतिवेगाने होण्यास मदत मिळणार आहे. तसेच यांची सुधारणा होत असल्यामुळे त्यातील गळती रस्ता खचण्याच्या होणाऱ्या घटनांचे प्रमाण कमी होणार आहे.

या अस्तरिकरण कामाची उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता सुनीलदत्त रसाळ, कार्यकारी अभियंता मिलिंद व्हटकर, प्रशांत रणसुरे, मधुसूदन सोनवणे आदींनी शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलाजवळील शांतिनिकेतन पर्जन्य जल पातमुख (आऊटफॉल) जवळ पाहणी केली.

मुंबईच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे आणि मुंबईत खाडी परिसर आहे. कमानी तथा बंदीस्त पर्जन्य जलवाहिन्या प्रणालीमधून पावसाचे पाणी समुद्रात सोडण्याच्या दृष्टीकोनातून भरती-ओहोटी महत्त्वाचा भाग आहे. शहर विभागात ४९५ किलोमीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्या आहेत. तसेच पूर्व उपनगरांत आणि पश्चिम उपनगरांत प्रत्येकी ६३ किलोमीटर, असे एकूण ६२१ किलोमीटर लांबीच्या कमानी तथा बंदिस्त पर्जन्य जलवाहिन्या आहेत. जुन्या झालेल्या कमानी पर्जन्य जलवाहिन्यांच्या काही भागांमध्ये अनेक भेगा, विटांचे विस्थापन, दोन विटांमधील सांध्यांचे नुकसान, छताचा भाग कोसळणे यासह काही इतर दोष हे प्रचलन व परिरक्षण विभागाद्वारे करण्यात आलेल्या सीसीटीव्ही सर्वेक्षणात आढळून आले होते. त्यात २३ हजार ५४८ मीटर लांबीच्या ५६ कमानी पर्जन्य जलवाहिन्या दोष अवस्थेत आढळल्या. यापैकी १४ हजार २८५ मीटर लांबीच्या २७ कमानी पर्जन्य जलवाहिन्या (टप्पा क्रमांक १ मध्ये) तातडीने पुनर्वसन करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.

महानगरपालिकेच्या प्रचलन व परिरक्षण विभागाद्वारे याबाबत भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) (आय. आय. टी. मुंबई) आणि वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्ही. जे. टी. आय.) या दोन्ही संस्थांशी चर्चा करून जुन्या कमानी पर्जन्य जलवाहिन्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान सुचविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या दोन्ही संस्थांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर तांत्रिक सल्लागार समितीची नोव्हेंबर २०२२ मध्ये बैठक घेण्यात आली होती. समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सध्या उपलब्ध असलेल्या सर्व तंत्रज्ञानामध्ये कमानी पर्जन्य जलवाहिन्यांच्या पुनर्वसनासाठी जिओपॉलिमर अस्तर खंदकरहित तंत्रज्ञानाद्वारे डागडुजी करण्यात येत आहे.

पर्जन्य जलवाहिनी विभागाने टप्पा १ मध्ये शहर परिसरातील कमानी जलवाहिन्यांचे जिओपॉलिमर अस्तरीकरण खंदकरहित तंत्रज्ञानाद्वारे सुरू करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वापरण्यात येत असलेले जिओपॉलिमर अस्तर खंदकविरहीत तंत्रज्ञान हे भारतामध्ये प्रथमच वापरण्यात येत आहे. अशा प्रकारची कामे इतर देशांमध्ये मुख्यतः अमेरिकेत केली जातात.

पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढणार

मागील काही वर्षांत हवामान बदलांमुळे मुंबईत पावसाळ्यात अवघ्या काही दिवसात सुमारे १ हजार मिमी पाऊस कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या अतिजोरदार पावसामुळे मुंबईत सखल भागांमध्ये प्रसंगी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तंत्रज्ञान पर्यावरणपूरक

सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या २७ भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे (१४ हजार २८५ मीटर लांबी) पुनर्वसन करण्यात येत आहे. यामुळे या जलवाहिन्यांचे आयुष्य किमान ५० वर्षांनी वाढणार आहे. यामुळे पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढवण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक असल्याची माहिती प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता सुनीलदत्त रसाळ यांनी दिली.

Comments
Add Comment