मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित ‘दादा’ या बहुप्रतीक्षित बायोपिक सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार होत असून, या सिनेमात सौरव गांगुलीच्या भूमिकेत अभिनेता 'राजकुमार राव' झळकणार आहे.
या सिनेमाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्स या बॅनरखाली होत आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर क्लॅपरबोर्डचा फोटो शेअर करत “लाईट्स, कॅमेरा, क्रिकेट! ‘दादा’चं चित्रिकरण सुरू झालंय,” अशी घोषणा केली आहे.
दिग्दर्शक मोटवानेंनीही त्यांच्या सोशल मीडियावर ईडन गार्डन्स इथं सौरव गांगुली स्टँडचा फोटो शेअर करत “आसनस्थ व्हा” असं कॅप्शन दिलं. दरम्यान, राजकुमार राव यांनी “सुरुवात झाली आहे… एकमेवाद्वितीय #दादा” असं म्हणत या प्रवासाची सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.
या सिनेमाच्या कथानकाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सौरव गांगुलींच्या क्रिकेट कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांचा यात समावेश असणार आहे. १९९२ ते २००८ दरम्यान भारताचे प्रतिनिधित्व करताना गांगुली यांनी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून १८,५७५ धावा केल्या असून त्यांच्या नावावर ३८ शतके आहेत.
यापूर्वी २०२५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सौरव गांगुलीनं राजकुमार रावच्या निवडीचं स्वागत केलं होतं. “योग्य व्यक्ती ही भूमिका साकारत आहे. मी त्याला पूर्ण सहकार्य करेन,” असे त्यानं सांगितलं होतं. हा सिनेमा क्रिकेटप्रेमींसाठी आणि सौरव गागुलींच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार असून हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.