नवी दिल्ली: पूर्व इंडोनेशियामध्ये गुरुवारी सकाळी मोठा भूकंप झाला, ज्यामुळे भीती पसरली. रिश्टर स्केलवर ७.४ तीव्रतेच्या या शक्तिशाली भूकंपामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मोलुक्का समुद्रात सुमारे ३५ किलोमीटर खोलीवर होता. तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपामुळे मालमत्तेचे आणि जीवितहानीचे किती नुकसान झाले आहे, हे अद्याप समजलेले नाही.
धोकादायक त्सुनामी लाटेचा इशारा
अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीनुसार, भूकंपानंतर त्सुनामीच्या लाटा शेजारील देशांना धडक देऊ शकतात. पूर्व इंडोनेशियातील टर्नाटे शहराच्या किनाऱ्याजवळ उत्तर मोलुक्का समुद्रात झालेल्या भूकंपानंतर जवळच्या बेटांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीनुसार, भूकंपाच्या केंद्रापासून १ हजार किलोमीटरच्या त्रिज्येतील इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि मलेशियाच्या किनाऱ्यांवर धोकादायक त्सुनामी लाटा धडकण्याची शक्यता आहे.
लडाखमधील लेहला भूकंपाचे धक्के
गुरुवारी सकाळी लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) आकडेवारीनुसार, आज पहाटे भूकंप झाला.
उत्तर दिल्लीत भूकंपाचे धक्के
दरम्यान, आज सकाळी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या उत्तर भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, त्याची तीव्रता कमी असल्यामुळे बहुतेक लोकांना तो जाणवला नाही. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे समोर आले नाही.






