नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून जोरदार आणि तीव्र स्वरुपाचे उत्तर दिले जाईल. ऑपरेशन अद्याप समाप्त झालेले नाही. काही आगळीक करण्याचा प्रयत्न केल्यास जोरदार प्रत्त्युत्तर दिले जाईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. मध्यपूर्वेत सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी शेजाऱ्यांना इशारा दिला. ऑपरेशन सिंदूर अजून सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले. सिंह यांनी यावेळी भाषणात थेट कोणत्याही देशाचे नाव घेण्याचे टाळले.
केरळममध्ये आयोजित सैनिक सन्मान संमेलन कार्यक्रमात राजनाथ सिंह बोलत होते. इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना भारतीय नौसेना सुरक्षितपणे बाहेर काढून देशात आणत आहे. देशात इंधन तुटवडा असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी खोडून काढला. मध्यपूर्वेतील संघर्षावरुन काहीजण विनाकारण अफवा पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही सिंह म्हणाले. देशात पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधक इंधन, तेल या विषयावरुन राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कठीण काळात देशाबरोबर उभं न राहता ते राजकारण करत असल्याचे सिंह म्हणाले. “मध्यपूर्वेत संघर्ष सुरु असल्याने हा काळ थोडा आव्हानात्मक आहे. केरळममधील अनेक लोक या भागात काम करतात पण, त्यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेत आहे, त्यामुळे अधिक काळजी करु नये, असे राजनाथ सिंह म्हणाले.






