मुंबई : भोंदू बाबा खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून कार्य करणारे अजय मिसर यांनी वाढत्या कामाच्या ताणामुळे खरात यांचा खटला लढविण्यास नकार दिला आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणात मिसर यांनी अशी भूमिका का घेतली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असून त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का अशी चर्चा सध्या नाशिकच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन वर्तुळात सुरू आहे.
२०११ मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसेच अन्य महत्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. अजय मिसर यांनी नकार दिल्याने सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच युक्तिवाद करणार आहेत.
दरम्यान, शिर्डी येथील गुन्ह्याच्या तपासात अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिला चौकशीसाठी एसआयटी बोलविण्याच्या तयारीत असताना ती फरार झाली. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना खरातला अटक करण्यासाठी एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचले. पण, कल्पना खरात फरार झाल्याने पथकाने अशोक खरात याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.






