Wednesday, April 1, 2026

Chief Minister's Employment Creation Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाकडे नेणारी प्रभावी वाटचाल

Chief Minister's Employment Creation Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाकडे नेणारी प्रभावी वाटचाल
मुंबई: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील युवकांना उद्योजकतेकडे प्रोत्साहन देत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती साध्य करण्यात उद्योग विभागाला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग विभागाने प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उद्योग विभागांतर्गत उद्योग संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, राज्याचा एकूण लक्ष्यांक ३० हजार अर्जांचा होता. त्यापैकी २५ हजार ५८७ अर्जांना बँकांकडून मंजुरी देण्यात आली असून ८५.२९ टक्के लक्ष्यपूर्ती साध्य झाली आहे. तसेच ६,१९३ प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष कर्ज वितरण करण्यात येऊन २१,३५६.९८ लाख इतका निधी युवक उद्योजकांपर्यंत पोहोचला आहे. उर्वरित प्रकरणांची कर्ज वितरण प्रक्रिया सुरू आहे. उद्दिष्टपूर्तीमध्ये सांगली जिल्हा हा राज्यात अव्वल ठरला असून कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, धाराशिव, लातूर, अमरावती, गडचिरोली, जळगाव आणि वाशीम या जिल्ह्यांनी १०० टक्केपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

युवकांसाठी योजनेचे महत्त्व आणि भविष्यातील फायदे

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही केवळ आर्थिक सहाय्य देणारी योजना नसून युवकांना स्वावलंबी बनविण्याचे प्रभावी साधन ठरत आहे. स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली सहाय्य उपलब्ध होते. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती वाढते. ग्रामीण व अर्धशहरी भागात उद्योगाला चालना मिळते. कौशल्याधारित व्यवसायांना प्रोत्साहन मिळते. स्थलांतर कमी होऊन स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होते.

'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना युवकांसाठी परिवर्तनाची संधी'

मंत्री उदय सामंत म्हणाले, "राज्य शासनाच्या धोरणात्मक पाठबळामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना युवकांसाठी परिवर्तनाची संधी ठरत आहे. जिल्ह्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी ही प्रशासन, बँका आणि युवकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. भविष्यात अधिक व्यापक स्तरावर ही योजना राबवून प्रत्येक इच्छुक युवकापर्यंत उद्योगाची संधी पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बळकटी मिळत असून ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल उचलले गेले आहे."

गडचिरोली नक्षलवादाच्या ओळखीपासून देशातील स्टील हब म्हणून दमदार वाटचाल

एकेकाळी नक्षलवाद प्रभावित जिल्हा म्हणून ओळख असलेला गडचिरोली आज ‘देशातील स्टील हब’ म्हणून आपली नवी ओळख निर्माण करत आहे. मोठ्या उद्योगांसोबतच लघु व सूक्ष्म उद्योजकांची निर्मितीही वेगाने वाढत असून स्थानिक युवक उद्योजकतेकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जिल्ह्याने साधलेली शंभर टक्क्यांहून अधिक उद्दिष्टपूर्ती ही या सकारात्मक परिवर्तनाची ठोस साक्ष आहे. या माध्यमातून उद्योग विभाग गडचिरोलीची नक्षलवादाशी जोडली गेलेली जुनी प्रतिमा पुसून विकास, रोजगार आणि स्वावलंबनाचा नवा अध्याय लिहिण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट होते. पुढे बोलताना मंत्री उदय सामंत यांनी म्हटले की, "राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या आकडेवारीवरून उद्योग विभागाची भूमिका अत्यंत सकारात्मक आणि परिणामकारक राहिल्याचे स्पष्ट दिसून येते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून आम्ही केवळ कर्ज वितरणावर भर न देता युवकांना सक्षम उद्योजक बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील युवकांनाही उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबी बनविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. येत्या काळात अधिक वेगाने, पारदर्शकपणे आणि परिणामकारकरीत्या ही योजना राबवून राज्यातील प्रत्येक इच्छुक युवकाला स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा ठाम निर्धार आहे."
Comments
Add Comment