Wednesday, April 1, 2026

जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचाच भाग, अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ - कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचाच भाग, अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ - कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

मुघल, इंग्रज आणि तत्कालीन काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा नीतीमुळेच हिंदू विभागले : मंत्री लोढा यांचा घणाघात

मुंबई : भारतात विविध जाती धर्म अस्तित्वात असले तरी ते मुळात हिंदू सांस्कृतिक विचारधारेशी एकरूप आहेत. जैन धर्मियांची पूजा पद्धती वेगळी असली तरी ते हिंदुच असून आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनीं केले आहे. मंत्रालयातील दालनात ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री लोढा पुढे म्हणाले की, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती असून त्यांचे विचार आजही राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक आहेत. जो पर्यंत हिंदू एकत्रित येत नाही, तो पर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण साध्य होणार नाही. अल्पसंख्यांक राहून हे उदिष्ट साध्य होणार नाही,असेही मंत्री लोढा म्हणाले.

एकेकाळी भारतावर मुघल आणि इतर मुस्लिम राजांनी आक्रमण केले. त्यांनी हिंदू आणि जैन धर्मीयांमध्ये फूट पाडली. ब्रिटिश राजवटीतही फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून अनेक गटांना अल्पसंख्यांक बनवण्यात आले. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन काँग्रेस राजवटीतही जाती धर्मात तेढ निर्माण करून हिंदूंना विभागण्यात आले. जगाला मानवता शिकवणारे जैन आणि हिंदूंमध्ये विष पेरून काँग्रेसने अल्पसंख्यांक घटक अधिक बळकट केले. मात्र मुस्लिम समुदायात जाती असल्या तरी कधीही त्यांची विभागणी काँग्रेसने केली नाही. दक्षिणेतही एकेकाळी २२ते २३ टक्के जैन धर्मीय समुदाय होता. आता केवळ हा समाज तिकडे ३ टक्के इतकाच आहे. हे सर्व काँग्रेसच्या षढयंत्राचा भाग असल्याचा घणाघात ही मंत्री लोढा यांनी केला. मात्र आता जनतेला हिंदुत्वाच्या एकतेचे मर्म कळले आहे. असेही त्यांनी सांगितले.

रामजन्मभूमी आंदोलनात देशातील सर्व अल्पसंख्यांक समुदायानेही भाग घेतला. पूजेची माध्यमं जरी वेगळी असली तरी आम्ही हिंदुच आहोत हे सर्व समुदायांना पटले आहे. त्यामुळेच काही जैन मुनींसोबत झालेल्या चर्चेनंतरच अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याचा विचार पुढे आला आहे. देशभरात यावर विविध स्तरावर चर्चा घडवून यासंदर्भात कायदेशीर कार्यवाही करण्याबाबतही विचार असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment