मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाबाबत (Iran-US-Israel War) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मंगळवारी (३१ मार्च) मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्य इराणमधील आपले लष्करी अभियान लवकरच संपवणार आहे. यासाठी त्यांनी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी सांगितला. या काळात इराणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू राहील, मात्र हवाई हल्ले थांबणार नाहीत.
व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमादरम्यान २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या (Iran-US-Israel War) युद्धानंतर इंधनाच्या वाढत्या किंमतींच्या परिणामाबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले, “मला फक्त इराणमधून बाहेर पडायचे आहे आणि आम्ही ते लवकरच करू. त्यानंतर किंमती मोठ्या प्रमाणात खाली येतील.” ते पुढे म्हणाले, “आमचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कदाचित दोन आठवड्यांत किंवा त्याहून थोड्या कालावधीत लष्करी कारवाई संपवून सैन्याला परत बोलावले जाईल.”
अमेरिकन सैन्य (Iran-US-Israel War) कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून अमेरिकन कंपन्यांना असलेल्या संभाव्य धोक्याबाबतही भाष्य केले. त्यांनी सांगितले की पश्चिम आशियात कार्यरत अमेरिकन कंपन्यांना इराणकडून कोणताही मोठा धोका नाही. त्यांनी प्रश्न उपस्थित करत विचारले की, “इराणने खरंच हल्ला करण्याची किंवा कंपन्या उडवून देण्याची धमकी दिली आहे का?” ट्रम्प म्हणाले की इराण असे कोणतेही पाऊल उचलणार नाही आणि अमेरिकन कंपन्यांवर हल्ला करणार नाही.
त्यांनी पुढे सांगितले की इराण अण्वस्त्रांचा वापर करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे अशा प्रकारची शस्त्रेच नाहीत. ट्रम्प यांनी दावा केला की इराणमधील बहुतेक जुने नेते आता सत्तेत नाहीत, त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत धोका कमी झाला आहे. त्यांच्या मते सध्याची परिस्थिती अधिक नियंत्रणात असून चिंतेचे कारण कमी आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की पुढील अनेक वर्षे इराण अण्वस्त्रे तयार करू शकणार नाही. तसेच त्यांनी इशारा दिला की भविष्यात इराणने पुन्हा अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिका पुन्हा कठोर कारवाई करेल. ट्रम्प यांनी इराणच्या पूर्वीच्या नेतृत्वाला कट्टर आणि धोकादायक म्हटले, मात्र सध्याचे नेतृत्व तुलनेने अधिक संतुलित आणि कमी कट्टर असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी पत्रकार परिषदेत हाच संदेश पुन्हा दिला. ते म्हणाले, “पुढे जाऊन ही फक्त आमची समस्या राहणार नाही. होर्मुज सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की युद्धाचे पुढील काही दिवस निर्णायक ठरणार असून या संघर्षात अमेरिकन स्थलसेनेची भूमिका असण्याची शक्यता त्यांनी नाकारली.