मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. हिंदू पुराणानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला हनुमान यांचा जन्म झाला. हिंदू धर्मात हनुमान म्हणजेच बुद्धीच, सुदृढ आरोग्याचं दैवत आहे. हनुमान हे त्यांच्या भक्तांवर आलेलं संकत हरण करतात म्हणून त्यांना संकटमोचन असेही म्हटले जाते.पाहुयात यंदाची हनुमान जयंती ही नेमकी कधी आहे? आणि जाणून घेऊयात योग्य शुभ मुहूर्त आणि तिथी.
हनुमान जयंती तिथी
हिंदू पंचांगानुसार, यंदा चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 07.07 वाजता सुरू होऊन 2 एप्रिलच्या सकाळी 07.42 वाजेपर्यंत समाप्त असेल. त्यामुळे उदया तिथीनुसार हनुमान जयंती 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. भाविक या दिवशी उपवास आणि विधिवत पूजा करून हनुमानाचा आशीर्वाद घेऊ शकतात.
हनुमान जयंती पूजेचा शुभ मुहूर्त
धार्मिक मान्यतेनुसार, शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने त्याचे लाभ अनेक पटींनी वाढतात. यावेळेस हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 6.10 वाजेपासून ते सकाळी 7.44 वाजेपर्यंत पूजेची उत्तम वेळ असेल.तसेच संध्याकाळी 6.39 वाजेपासून ते संध्याकाळी 8.06 वाजेपर्यंत देखील पूजा करता येईल.
ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.38 वाजेपासून ते पहाटे 5.24 वाजेपर्यंत पर्यंत असेल. अभिजित मुहूर्त दुपारी 12:00 वाजेपासून ते दुपारी 12:50 वाजेपर्यंत राहील.
हनुमान जयंतीच्या दिवशीचा शुभ योग
यावेळेस हनुमान जयंतीला 'ध्रुव योग' आणि 'हस्त नक्षत्र' यांचा खास योग जुळून येत आहे. ध्रुव योग दुपारी 2.20 वाजेपर्यंत असेल, जो अत्यंत शुभ मानला जातो. याशिवाय संध्याकाळपर्यंत हस्त नक्षत्राचा प्रभाव राहील, ज्यामुळे पूजा-अर्चेचे महत्त्व अधिकच वाढणार आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी मनोभावे पूजा आणि व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात. भीती, रोग आणि अडथळे नष्ट होऊन व्यक्तीला शक्ती, साहस आणि यशाचा आशीर्वाद मिळतो; असे म्हणतात.






