मुंबई : राज्यातील लाखो महिला या महायुती सरकारच्या लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत आहेत. ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवून स्वतःला सक्षम करत आहेत. परंतु काही महिलांना ई-केवायसीच्या समस्या या कायम भेडसावत आहे, त्यामुळे सरकराने ई - केवायसी ची मुदत वाढवली आहे.
खेडयापाडयात राहणाऱ्या महिलांना तांत्रिक अडचणींमुळे वेळेत केवायसी पूर्ण करता आली नाही. त्यामुळे या योजनेचा सर्व स्त्रियांनी लाभ घ्यावा त्यासाठी सरकारने हे महत्वाचे पाऊल उचललेले आहे. याची घोषणा महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली.
एप्रिल पर्यंत वाढवली मुदत
महायुती सरकारच्या घोषणेनुसार लाडकी बहीण योजनेसाठी ई - केवायसी करण्याची मुदत ही ३० एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या महिलांचे केवायसी अद्याप बाकी आहे त्यांनी संधीचा वापर करून आपली केवायसी पप्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे देखील आवाहन सरकारने केले आहे. या मुदत वाढीचा आणखी एक फायदा म्हणजे ज्या स्त्रियांच्या फॉर्म मध्ये चुका झाल्या असतील त्यांना देखील चुका सुधारण्यासाठी हि संधी मिळणार आहे.
ई - केवायसी प्रक्रिया थोडक्यात
लाडकी बहीण पोर्टलवर जाऊन लॉगिन करावे. केवायसी प्रक्रियेचा पर्याय निवडावा आपला आधार आणि दिलेला कॅप्चा कोड तिथे भरवावा send otp वर क्लिक करून आपला जात प्रवर्ग निवडून सर्व भरलेल्या माहितीची पडताना करूनच शेवटच्या submit वर क्लिक करावे.
आवश्यक कागदपत्रे
या प्रक्रियेसाठी लाभार्थी महिलेचे आधार कार्ड , फोटो, रेशन कार्ड आणि उत्पन्नाची माहिती असणे आवश्यक आहे. रहिवासी पुराव्यासाठी डोमेसाइल प्रमाणपत्र किंवा १५ वर्षपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखल यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल.
महिलेचा जन्म परराज्यातील असेल, तर पतीचे १५ वर्षांपूर्वीचे अधिवास सिद्ध करणारे कागदपत्र आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असावे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही, मात्र शुभ्र शिधापत्रिका असल्यास ते जोडावे लागेल. यासोबतच बँक खाते तपशील आणि हमीपत्र देणे अनिवार्य आहे.
राज्यातील सर्व महिलांना या योजनेचा पुरेपूर लाभ मिळावा यासाठीच सरकारने हा नवा नियम किंवा ही संधी महिलांसाठी उपलब्ध करून दिली आहे.






