मुंबई : धुरंधर २ सिनेमा जगभरात धूमाकूळ घालत आहे. या सिनेमानं कमाईच्या बाबतीतही सगळे रेकॉर्डब्रेक केले आहेत. मात्र, दिग्दर्शक आदित्य धर आणि धुरंधर २ सिनेमा अडचणीत सापडणार असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. एका प्रसिद्ध लेखकानं धुरंधर २ सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य धरवर स्क्रिप्ट चोरल्याचा गंभीर आरोप केला असून या लेखक आणि फिल्ममेकरचं म्हणणं आहे की, रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'धुरंधर : द रिव्हेंज' याचं त्यांनी २०२३ मध्ये लिहिलेल्या ओरिजिनल स्क्रिप्टशी खूप साधर्म्य आहे.
प्रसिद्ध लेखक आणि फिल्ममेकर संतोष कुमार आर.एस. यांनी आदित्य धरवर धुरंधर २ सिनेमात आपली स्क्रीप्ट चोरल्याचा आरोप केला आहे. संतोष कुमार यांनी असंही म्हटलं आहे की, ही स्क्रिप्ट फक्त एन्टरटेन्मेंटसाठी तयार करण्यात आलेली. पण ती चोरुन तिचा वापर राजकीय प्रोपोगंडा राबवण्यासाठी करण्यात आला असून आदित्य रॉय कपूरला घेऊन सिनेमा बनवण्याचा त्यांचा मानस होता, पण, आदित्य धरनं त्यांची पटकथा चोरली आणि त्याऐवजी 'धुरंधर २' फिल्मची निर्मिती केली. याबाबत लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, त्यावेळी ते सर्व पुरावे सादर करणार असल्याचंही सांगितलं आहे. संतोष कुमार आर.एस. यांनी केलेल्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.
संतोष कुमार आर.एस. यांनी सांगितलयं की, स्क्रिप्ट लिहिल्यानंतर त्यांनी ती सोनी, झी, टी-सीरीज आणि धर्मा प्रोडक्शन्स यांसारख्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसकडे पाठवली होती. त्यावेळी त्यांनी मुख्य भूमिकेसाठी आदित्य रॉय कपूर यांची निवड केली होती. तसेच, ही स्क्रिप्ट त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये स्क्रीनरायटर्स असोसिएशनमध्ये नोंदवली होती. त्यांच्याकडे ईमेल, कम्युनिकेशन, स्केचेस आणि पूर्ण स्क्रिप्टचे दस्तावेजही उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
'धुरंधर २' सिनेमात अभिनेता रणवीर सिंहनं हमजा अली मजारी आणि जसकीरत सिंह रंगी या भूमिका साकारल्या आहेत. तर, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी आणि गौरव गेरा हे दमदार कलाकार झळकले आहेत. हा सिनेमा २६/११ हल्ले आणि नोटबंदी यांसारख्या वास्तववादी घटनांपासून प्रेरित असल्याचे सांगितले जातंय. पाकिस्तानमधील लियारी भागात एका भारतीय गुप्तहेराचा प्रवेश आणि त्याच्या मिशनभोवती ही कथा फिरते.
संतोष कुमार आर.एस. यांनी 'धुरंधर २' रिलीज झाल्यानंतर पाहिला, त्यावेळी त्यांना त्यांच्या कथेची झलक त्यात स्पष्टपणे दिसली. दक्षिण भारतातून येणाऱ्या लेखकांचं शोषण थांबवण्यासाठी हा मुद्दा पुढे आणल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं आहे. मात्र, या आरोपांवर अद्याप दिग्दर्शक आदित्य धर किंवा सिनेमा निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या आरोपांवर आता आदित्य धर काय प्रतिक्रिया देणार याकडेच सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.






