Tuesday, March 31, 2026

Trump : तुमचे पेट्रोल-डिझेल तुम्हीच मिळवा, ‘हॉर्मुझ’वरून ट्रम्प यांचा ब्रिटनसह मित्र राष्ट्रांना इशारा

Trump : तुमचे पेट्रोल-डिझेल तुम्हीच मिळवा, ‘हॉर्मुझ’वरून ट्रम्प यांचा ब्रिटनसह मित्र राष्ट्रांना इशारा

वॉशिंग्टन : ‘जा आणि तुमचे कच्चे तेल (पेट्रोल-डिझेल ) तुम्हीच मिळवा!’, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्यांमध्ये अमेरिकेला साथ न देणाऱ्या मित्र राष्ट्रांना दिला आहे. सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ज्या देशांनी ‘इराणविरोधातील मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला, त्यांनी एकतर अमेरिकेकडून तेल विकत घ्यावे किंवा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून स्वतः जाऊन ते मिळवावे. आपल्या पोस्टच्या ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आता या देशांना स्वतःसाठी ‘लढायला’ शिकावे लागेल. ज्याप्रमाणे कठीण काळात हे मित्रराष्ट्र अमेरिकेच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, त्याचप्रमाणे यापुढे अमेरिकाही त्यांना कोणतीही मदत करणार नाही.

‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे ज्या देशांना जेट इंधन मिळत नाही. जसे की युनायटेड किंगडम (यूके), ज्याने इराणविरुद्धच्या कारवाईत सामील होण्यास नकार दिला. त्यांच्यासाठी माझ्याकडे एक सल्ला आहे. पहिले म्हणजे, अमेरिकेकडून तेल विकत घ्या, आमच्याकडे भरपूर साठा आहे. दुसरे म्हणजे, थोडे उशिरा का होईना पण धाडस दाखवा, सामुद्रधुनीत जा आणि स्वतःचे तेल स्वतः मिळवा,’ असे ट्रम्प यांनी लिहिले. ट्रम्प यांनी पुढे नमूद केले की, ‘तुम्हाला आता स्वतःची लढाई स्वतः लढायला शिकावे लागेल. अमेरिका आता मदतीसाठी तिथे नसेल, कारण तुम्हीही आमच्यासाठी तिथे नव्हता. इराणचा जवळपास नायनाट झाला आहे, कठीण काम पूर्ण झाले आहे. आता जा आणि तुमचं तेल तुम्हीच मिळवा.’ दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंर महिना उलटला तरी, इराणने अजूनही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण कायम ठेवले आहे, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होत आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधील इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून मित्रदेशांवर, विशेषतः ब्रिटनवर आगपाखड केली. ‘ज्या देशांनी इराणविरुद्धच्या मोहिमेत अमेरिकेला साथ दिली नाही, त्यांना आता स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागेल," असेही ट्रम्प म्हणाले. यामुळे आता आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडू शकते.

देशावर आक्रमण करणाऱ्यांचे पाय कापून टाकले जातील, इराणचा अमेरिकेला इशारा : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. यादरम्यान अमेरिका जमिनीवरून हल्ला करण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच, इराणकडून अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या शेजारच्या आखाती देशांवर हल्ले केले जात आहेत. यादरम्यान इराणने देशावर आक्रमण करणाऱ्यांचे पाय कापून टाकले जातील असा इशारा दिला आहे. आपल्या (इराणच्या) भूमीवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सज्ज आहे, असे विधान इराणच्या एका वरिष्ठ लष्करी प्रवक्त्याने केले आहे. इराणची सरकारी वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. प्रेस टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, खातम अल-अन्बिया मुख्यालयाचे प्रवक्ते इब्राहिम झोल्फाघरी म्हणाले की, “इराणचे सशस्त्र दल देशावर आक्रमण करणाऱ्या कोणत्याही आक्रमकाचे पाय कापून टाकेल.”

इटलीने अमेरिकन फायटर जेटची विनंती फेटाळली : इराण युद्धात इटलीने अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. मध्य पूर्वेच्या दिशेने जाणाऱ्या एका अमेरिकन लढाऊ विमानाला इटली सरकारने सिसली येथे उतरण्यास मज्जाव केला. इटलीच्या सरकारने इराण युद्धापासून दूर राखण्याचा निर्णय घेतला आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविरोधात निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, सिसलीमध्ये अमेरिकन विमानांनी लँडिंगची परवानगी मागितली होती परंतु इराणने ती नाकारली. त्यामुळे अमेरिकन सैन्य मोहिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मध्य पूर्वेतील मिशनसाठी सिसली धोरणात्मक ठिकाण आहे. विशेष म्हणजे एक दिवसाआधीच स्पेनने अमेरिकन विमानांसाठी त्यांची एअरस्पेस बंद केली होती. आता इटलीने अमेरिकन विमानांना लँडिंगची परवानगी नाकारली. इटलीचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो कारण इटली नाटो देशाचा सदस्य आहे. युरोपात इटलीचं वर्चस्व आहे. सोबतच पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. मेलोनी या युरोपातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधी कार्यक्रमात आमंत्रित केले होते. अनेकदा मेलोनी यांनी ट्रम्प यांना वाचवण्याचं काम केले. मात्र इराण युद्धात इटलीच्या या निर्णयाने अमेरिकेला धक्का बसला आहे.

महागाई वाढणार, आर्थिक विकास मंदावणार : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गंभीर इशारा दिला आहे. या युद्धामुळे ऊर्जा क्षेत्रासोबतच जागतिक पुरवठा साखळी, वाहतूक, विमा खर्च आणि उत्पादन खर्च यावर मोठा परिणाम होत असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. आयएमएफच्या मते, या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम ऊर्जा आयात करणाऱ्या देशांवर, विशेषतः आशिया आणि युरोप या प्रदेशांवर होणार आहे. इंधन आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे महागाई वाढेल आणि आर्थिक विकास मंदावेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा