Tuesday, March 31, 2026

Navnath Ban : मतदारांनी नाकारल्यामुळे संजय राऊत, उबाठा गट नामर्द बनल भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

Navnath Ban : मतदारांनी नाकारल्यामुळे संजय राऊत, उबाठा गट नामर्द बनल भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : १४० कोटी भारतीय नेभळट आणि भ्याड नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना जनतेला कोणाची भीती नाही मात्र विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पराभूत करून मतदारांनी उबाठा गट आणि संजय राऊत यांना नामर्द, नेभळट केले आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. अमेरिकन जनता ट्रम्प विरोधात रस्त्यावर उतरली म्हणून अमेरिकन जनतेचे कौतुक करून भारतात मात्र भारतीय जनता पार्टीने जनतेला नामर्द, भ्याड बनवले आहे असा आरोप केला होता त्यावर पलटवार करत राऊतांना त्यांनी लक्ष्य केले. भाजपाने जनतेला सक्षम बनवले असल्याचे ते म्हणाले.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणांमध्ये ‘हमाम मे सब नंगे’ असे म्हणणा-या राऊतांना खडे बोल सुनावत श्री. बन म्हणाले की भोंदूबाबा खरातच्या आश्रमाला पाणी पुरवठा करणा-या, त्याला पायघड्या घालणा-या महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहेरबानीमुळेच भोंदूबाबाचे फावले होते. त्यामुळे भोंदूबाबा प्रकरणात म्हणजेच या हमाम मध्ये नेमके कोण कोण न्हाऊन निघाले होते असा खोचक सवाल श्री. बन यांनी केला. भोंदूबाबाला मिलिंद नार्वेकर भेटले होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कदाचित नार्वेकरांनी भोंदूबाबाला नवस बोलला असण्याची दाट शक्यता आहे असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. नार्वेकरांनी भोंदूबाबाकडे कोणता नवस बोलला होता हे स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी दिले.

भोंदूबाबा प्रकरणात थेट राष्ट्रपतींनी बोलावे, पंतप्रधानांनी बोलावे अशी हास्यास्पद मागणी करणा-या राऊतांना खरमरीत प्रश्न विचारत श्री. बन यांनी त्यांची कोंडी केली. भोंदूबाबा प्रकरणात उद्धव ठाकरे चकार शब्द काढत नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भोंदूबाबाच्या आश्रमाला शेतक-यांच्या हक्काचे पाणी का दिले या प्रश्नाचे उत्तर आधी उद्धव ठाकरे यांनी द्यावे असे ते म्हणाले. नार्वेकर आणि भोंदूबाबाची भेट का झाली याबद्दल नार्वेकर पत्रकारांसमोर येऊन खुलासा करणार आहेत का? असाही सवाल त्यांनी केला.

भोंदूबाबाच्या पापांचा पूर्ण कच्चाचिठ्ठा बाहेर काढल्याशिवाय आणि त्याला फासावर पोहोचवल्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार स्वस्थ बसणार नाही. महिलांचे लैंगिक शोषण करणा-या, कोट्यवधींची मालमत्ता जमा करणा-या भोंदूबाबाला बेड्या ठोकण्याचे काम महायुती सरकारने केले. मविआ सरकारमध्ये ती हिंमत नव्हती अशी टीका श्री. बन यांनी केली. जेलमध्ये खरात भोंदूचा घातपात होणार नाही वडेट्टीवार, राऊतांनी निश्चिंत रहावे मात्र या भोंदूबाबाला कायद्यानुसार निश्चित शिक्षा होणार अशी ग्वाही त्यांनी दिली.

सेंट्रल फोर्स मध्ये, अधिकाऱ्यांमध्ये, लष्करामध्ये अस्थिरता आहे असा ढोल बडवणा-या राऊतांच्या, भारतात अराजक पसरावे या स्वप्नावर श्री. बन यांनी कोरडे ओढले. राऊत यांच्या स्वप्नांना मुंगेरीलाल के हसीन सपने संबोधत त्यांनी खिल्ली उडवली. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कोठेही अस्थिरता नाही, देश मजबूत आहे. मात्र भारताचा होत असलेला विकास, प्रगती बघवत नसल्याने राऊत आणि विरोधक अस्वस्थ आहेत असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment