मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ एका नवीन वादात सापडले आहेत. त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले असून, मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीची दखल घेत कफ परेड पोलिसांनी संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
नेमके प्रकरण काय?
व्हिडिओ एडिट करून बदनामीचा प्रयत्न
या प्रकरणावर स्वतः नरहरी झिरवळ यांनी आपली बाजू मांडली आहे. "हा व्हिडिओ मूळ स्वरूपात नसून दोन-तीन वेगळे व्हिडिओ एकत्र जोडून (Edit करून) माझी बदनामी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हा व्हिडिओ बनावट असल्याचे त्यांचे म्हणणे असून, राजकीय हेतूने आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, "नरहरी झिरवळ यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा आणि तो जाणीवपूर्वक जोडून तयार केल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओची तांत्रिक शहानिशा केली जाईल आणि त्याची सत्यता तपासली जाईल. जर हा व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाले, तर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. मात्र, सत्य समोर आल्याशिवाय कोणताही घाईघाईने निर्णय घेतला जाणार नाही." सध्या या व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेली नाही. कफ परेड पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. व्हिडिओ खरंच छेडछाड केलेला आहे की त्यामागे काही वेगळे तथ्य आहे, हे आता पोलीस तपासातच स्पष्ट होईल.






