Tuesday, March 31, 2026

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीत राज्याने मोठी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या समुद्री उत्पादनांच्या निर्यातीत दुपटीने वाढ झाली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्याने ७ हजार ३४३ कोटी ४० लाख रुपयांची विक्रमी निर्यात नोंदवली आहे. भारताच्या मत्स्य व्यवसायात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून, गेल्या पाच वर्षांत राज्याच्या मत्स्य निर्यातीत कमालीची सुधारणा झाली आहे. २०२०-२१ मध्ये ३ हजार ६८४ कोटी रुपये असणारी ही निर्यात आता थेट दुप्पट होऊन २०२४-२५ या वर्षात ७ हजार ३४३ कोटी ४० लाख रुपयांवर पोहोचली आहे. केवळ आर्थिक उलाढालच नव्हे, तर निर्यातीच्या परिमाणातही मोठी वाढ झाली असून राज्याची वार्षिक निर्यात आता २.२७ लाख मेट्रिक टन इतकी झाली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसायाने जागतिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्र आता मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या क्रमांकाचे अग्रगण्य राज्य बनले असून, राज्याच्या अर्थव्यवस्थेला यातून मोठी चालना मिळाली आहे.

कोळंबीसह गोठवलेल्या मासळीचा निर्यातीत वाटा

महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील चविष्ट मासळीने आता जागतिक बाजारपेठ काबीज केली असून, प्रामुख्याने कोकणच्या कोळंबीला परदेशी खवय्यांची मोठी पसंती मिळत आहे. राज्यातून होणाऱ्या एकूण मत्स्य निर्यातीत कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीचा (Frozen Fish) वाटा सर्वाधिक असून, अमेरिका आणि चीन यांसारख्या बलाढ्य देशांमध्ये महाराष्ट्रातील उत्पादनांची मोठी मक्तेदारी निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींचे चढ-उतार आणि वाढता उत्पादन खर्च यांसारखी आव्हाने समोर असतानाही, महाराष्ट्राने गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या स्पर्धेत आपले स्थान भक्कम राखले आहे. भारताच्या एकूण निर्यातीचा विचार करता, अमेरिका (२२,७२३ कोटी रुपये) आणि युरोपियन युनियन (९,४२९ कोटी रुपये) या मुख्य बाजारपेठा ठरल्या आहेत. यामध्ये कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कोळंबीला सर्वाधिक मागणी असून, या 'विदेशी पाहुण्यांच्या' पसंतीमुळे राज्याच्या मत्स्य व्यवसायाला सुवर्णकाळ आला आहे.

भारतीय मासळीचा जगभर डंका

भारतीय सागरी उत्पादनांनी जागतिक बाजारपेठेत आपली मोहोर उमटवली असून अनेक देशांमध्ये भारतीय मासळीला विक्रमी मागणी मिळत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार, भारतीय मत्स्य उत्पादनांसाठी अमेरिका ही सर्वात मोठी आणि फायदेशीर बाजारपेठ ठरली असून, एकट्या अमेरिकेला २२ हजार ७२३ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. दुसरीकडे, परिमाणाच्या बाबतीत चीनने आघाडी घेतली असून ३.९६ लाख मेट्रिक टन मासळीची आयात केली आहे, ज्याचे मूल्य १० हजार ६६८ कोटी रुपये इतके आहे. केवळ अमेरिका किंवा चीनच नव्हे, तर युरोपियन युनियन (९,४२९.६ कोटी), दक्षिण-पूर्व आशिया (८,१७२.२ कोटी) आणि जपान (३,४५२.९ कोटी) यांसारख्या प्रमुख जागतिक बाजारपेठांमध्येही भारतीय मासळीने आपली चव पोहोचवली आहे. या वाढत्या मागणीमुळे भारतीय मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी उभारी मिळाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >