पंढरपूर : विठ्ठल चरणी अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यावरून आता पंढरपुरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. चैत्र एकादशीच्या निमित्ताने देवाला पूर्वापार परंपरेनुसार पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. मात्र, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या प्रथेवर आक्षेप घेतला आहे. देवाचा आहार हा भक्तांच्या आहाराशी सुसंगत असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेला आता वैचारिक विरोधाची धार लागल्याने, चैत्र एकादशीचा हा 'गोड' नैवेद्य वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
पंढरपुरात नैवेद्यावरून विठ्ठल पाटील आक्रमक
आषाढी, कार्तिकीप्रमाणेच चैत्र एकादशीलाही पंढरपुरात मोठी गर्दी असते. मात्र, यंदा ही एकादशी भक्तीऐवजी वादानेच अधिक गाजण्याची चिन्हे आहेत. विठ्ठलाला दाखवण्यात आलेल्या पुरणपोळीच्या नैवेद्यावर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सडकून टीका केली असून, मंदिर प्रशासनाच्या या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विठ्ठल पाटील यांच्या मते, एकादशीचे व्रत हे वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि मूळ भक्तीचे साधन आहे. हजारो वर्षांपासून लाखो भाविक निर्जळी उपवास करून ही एकादशी पाळतात. अशा अत्यंत कडक नियमांच्या दिवशी देवाला पुरणपोळीसारखा जड नैवेद्य दाखवणे, हे वारकरी परंपरेच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "एकादशीच्या दिवशी देवाला असा नैवेद्य दाखवणे ही अत्यंत निंदनीय घटना आहे आणि याचे मला मनापासून दुःख होत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील यांनी या प्रथेमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक पेचावर बोट ठेवले आहे. जर आमचा पांडुरंग स्वतः एकादशीला पुरणपोळी खात असेल, तर बाहेरील लोक आम्हा वारकऱ्यांना प्रश्न विचारतील की, तुमचा देव जेवतोय मग तुम्ही उपवास का करता? शास्त्राप्रमाणे उपवासाचा नैवेद्य हा एकादशीला न दाखवता, दुसऱ्या दिवशी (द्वादशीला) उपवास सोडताना दाखवायला हवा होता. मग एकादशीलाच हा घाट का घातला? जर चैत्र एकादशीला पुरणपोळी चालते, तर मग वर्षातील इतर एकादशींप्रमाणे ही एकादशी उपवासातून 'माफ' आहे का? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला आहे. हा नैवेद्य दाखवण्याचा निर्णय कोणी घेतला आणि कोणत्या शास्त्राच्या आधारे घेतला, याचा स्पष्ट खुलासा संबंधितांनी करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुरणातील कथांचा आधार घेऊन विठ्ठलाला नैवेद्य दाखवणे ही वारकरी संप्रदायाची शुद्धता धोक्यात आणणारी गोष्ट असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.






