Monday, March 30, 2026

Eknath Khadse : मोठी बातमी: खडसे पिता-कन्येवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन हडपल्याचा आरोप!

Eknath Khadse : मोठी बातमी: खडसे पिता-कन्येवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन हडपल्याचा आरोप!

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साखर कारखाना उभारण्याचे प्रलोभन दाखवून शेतकऱ्यांच्या 'महार वतन' जमिनी घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या हक्काच्या जमिनी हडप केल्याचा हा गंभीर आरोप समोर आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस आता पुढील कायदेशीर तपास करत असून, या घटनेमुळे खडसे पिता-कन्येच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय ?

नोकरी आणि मोबदल्याचे आमिष दाखवून फसवणूक

एकनाथ खडसे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचे मूळ २००२ सालच्या एका व्यवहारात असल्याचे समोर आले आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील गट क्रमांक १२२ मधील महार वतनाच्या जमिनीशी संबंधित हे जुने प्रकरण आता पुन्हा उजेडात आले आहे. चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसांच्या मालकीची ही जमीन असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 'तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना' उभारण्याचे आमिष दाखवून ही जमीन खरेदी करण्यात आली. जमिनीच्या बदल्यात कुटुंबातील सदस्यांना कारखान्यात कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. योग्य मोबदला आणि नोकरी, यांपैकी कशाचीही पूर्तता न करता केवळ कागदोपत्री व्यवहार करून जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

कारखान्याच्या नावावर घेतलेली जमीन चक्क खडसेंच्या कन्येच्या नावावर

तक्रारदार चमेलाबाई तायडे यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन हा जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यात आला. केवळ ५१ हजार रुपये आगाऊ देऊन आणि सर्व वारसदारांचे अंगठे घेऊन बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयात ही खरेदी प्रक्रिया पार पडली होती. ज्या जमिनीवर 'तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना' उभा राहणार होता, तिथे अनेक वर्षे उलटूनही काहीच हालचाल झाली नाही. जेव्हा २०२५ मध्ये तायडे कुटुंबाने या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. ही जमीन कारखान्याच्या नावावर नसून, ती थेट शारदा एकनाथ खडसे यांच्या वैयक्तिक नावावर असल्याचे कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे.

खरेदीखतात फेरफार करून नावात खाडाखोड...

११ फेब्रुवारी २०२६ रोजी जेव्हा मूळ खरेदीखताची अधिकृत प्रत तपासण्यात आली, तेव्हा त्यात धक्कादायक फेरफार झाल्याचे उघड झाले आहे. या पुराव्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील संशयाची सुई आता अधिक गडद झाली आहे. मूळ कागदपत्रांमध्ये जिथे 'तापी-पूर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज' असे नाव नोंदवण्यात आले होते, तिथे खाडाखोड करून 'शारदा एकनाथ खडसे' असे नाव घुसडण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दाद मागितली आहे.

एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल

बहुचर्चित जमीन व्यवहार प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर, चमेलाबाई तायडे यांच्या तक्रारीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्याभोवती कायदेशीर कचाटा अधिक घट्ट झाला आहे. या प्रकरणात केवळ खडसे पिता-कन्याच नव्हे, तर जमीन व्यवहारात मध्यस्थी करणारे सुधाकर पाटील आणि बोदवड दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. शासकीय कागदपत्रात फेरफार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment