मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि राकेश बेदी यांची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, याआधी धुरंधर रिलीज झाल्यानंतर रहमान डकैत अर्थात अक्षय (Akshaye Khanna) खन्नाची चर्चा जोरदार रंगलेली. धुरंधर २ सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी रहमान डकैतची आठवण काढली. धुरंधरमध्ये रहमान डकैतची भूमिका साकारलेल्या अभिनेता अक्षय खन्नानं आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडलीय. पण, धुरंधर सिनेमात अक्षय खन्नाचा मृत्यू झाल्याचं दाखवलंय आणि सिनेमाच्या पटकथेतलं त्याचं पात्र तिथेच संपलं.
मात्र, आता अक्षय खन्ना पुन्हा एका नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच अक्षय खन्ना एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच अभिनेता अक्षय खन्नाचा ५१ वा वाढदिवस पार पडला. त्यानिमित्तानं अक्षयच्या आगामी सिनेमातला त्याचा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षयचा हा लूक एका तेलुगू सिनेमातला असून बॉलिवूड गाजवणारा अभिनेता अक्षय खन्ना आता साऊथ इंडस्ट्रीत झळकणार आहे.
अक्षयचा हा लूक रहमान 'रहमान डकैत'च्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळा असून 'महाकाली' या आगामी सिनेमात दिग्दर्शक प्रशांत वर्मांच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं, ज्यात अक्षय खन्नाचा हटके लूक पाहायला मिळाला.
दिग्दर्शकानं आता सेटवरील एक BTS फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता अक्षय खन्ना गुरू शुक्राचार्यांच्या वेशात दिसत असून लांब पांढरे केस, दाढी, तीक्ष्ण आणि तेजस्वी डोळ्यांसह अक्षयचा हा लूक पाहून अभिनेत्याला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
अक्षय खन्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत वर्मांनी एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा अक्षय खन्ना सर... खरा कलाकार तोच, ज्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी गाजावाजाची गरज नसते. तुमचा स्क्रीन प्रेझेन्स, दमदार अभिनय आणि वेगळेपणा नेहमीच अगदी ठळकपणे दिसून येतो. तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपण मिळून केलेलं काम जगासमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे. लवकरच आणखी अपडेट्स देऊ..."
Happy Birthday #AkshayeKhanna sir, a true actor who proves that real talent doesn't need noise. Effortless screen presence, powerful performances, and unmatched class always stand out 🎭🎬
Its an absolute honour working with you. Can’t wait to show the world what we’ve created… pic.twitter.com/xiblaH8voc — Prasanth Varma (@PrasanthVarma) March 28, 2026
हिंदू पौराणिक कथेनुसार शुक्राचार्य हे असुरांचे गुरु मानले जातात आणि त्यांना 'मृतसंजीवनी' मंत्राचे ज्ञान असल्याचं सांगितलं जातं, ज्यामुळे मृतांना पुन्हा जीवदान देता येतं. 'महाकाली' या सिनेमाची कथा एका महिला सुपरहिरोभोवती फिरते. ही ताकदवान नायिका वाईट शक्तींविरुद्ध लढत न्याय प्रस्थापित करण्यासाठी सज्ज होते. अभिनेता अक्षय खन्नाचा हा दमदार लूक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.






