महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
पद्मपुराणानुसार एकदा नारदाने ब्रह्मदेवांना सदाचार म्हणजे काय असा प्रश्न विचारला. तेव्हा पितामह ब्रह्मदेव नारदाला उपदेश करताना सदाचाराबद्दल सविस्तर सांगतात. ब्रह्मदेव म्हणतात आचरणाचा महिमा मोठा आहे. सदाचार म्हणजे चांगली वागणूक. त्यामुळे पुरुषाला सुख मिळते व अधिक आयुष्य लाभते. आचरणाने हीन असणारा सर्व लोकांमध्ये निंदनीय ठरतो. अशा माणसाला नेहमी दुःख भोगावे लागते. तो रोगी व अल्पायुषी होतो व मरणोपरांत तो नरकवासी होतो.
सदाचार म्हणजे शुद्धता किंवा शुचिता आहे. शुभ कार्यप्रसंगी जमीन नेहमी गाईच्या शेणाने सारवावी, आसन, भांडे व तपाचा दगड पाण्याने स्वच्छ करून घ्यावा. तांब्याची भांडी आंबट पदार्थाने, तर कास्याची भांडी रत्नादी शुद्ध भस्माने स्वच्छ करावीत. दगडाची भांडी तेलाने स्वच्छ करावी. सोन्या-चांदीची भांडी पाणी शिंपडून स्वच्छ करावी. लोखंडाच्या भांड्यांची शुद्धता व स्वच्छता अग्नीत घालून तापवून अथवा स्वयंपाकानेच होते. यज्ञासाठी भूमी पवित्र करताना भूमीच्या वरच्या थराची माती काढून त्यावर लाकडी भुसा जाळून नंतरची भूमी गाईच्या शेणाने सारवून घ्यावी.
पुरुषांनी पत्नी, गादी, मूल, वस्त्र, जानवे व कमंडलू स्वतःचेच शुद्ध समजावे. दुसऱ्याच्या या वस्तू वापरणे अशुद्ध मानले जाते. म्हणून कधीही वापरू नयेत. आपली पत्नी रजस्वला असेल, तर तिच्याशी रतिक्रीडा करू नये. एका वस्त्राने आंघोळ करू नये, तसेच भोजन करू नये. दुसऱ्याने स्नान केलेली वस्त्रे वापरू नयेत. केस व दातांची स्वच्छता दररोज करावी. रोज सकाळी गुरुचरणांना वंदन करावे. दोन्ही हात, दोन्ही पाय व तोंड हे पाच अवयव स्वच्छ करून जेवण करावे.
आपले कुलदैवत, गुरू, आचार्य यांची आज्ञा मोडू नये. गाईचा कळप, देवता, ब्राह्मण तूप व मध यांना उजवीकडे ठेवूनच जावे तसेच प्रदक्षिणा करतानाही त्यांना उजवीकडे ठेवून जावे. श्रेष्ठ वनस्पतींनाही प्रदक्षिणा करावी. गाय, ब्राह्मण, दाम्पत्य, अग्नी यांचेमधून जाणाऱ्या व्यक्तीचे अध:पतन होते. उष्ट्या तोंडाने अग्नी, ब्राह्मण, देवता, गुरू, स्वतःची डोके, फुलांनी भरलेला वृक्ष, अधर्मी मनुष्य यांना स्पर्श करू नये. खाणे-पिणे होऊन हात-पाय धुतल्यावरच गुरू, देवता, राजा, प्रवचनकार यांचे दर्शन करावे. या सर्वांमध्ये सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र समाविष्ट असतात असे मानले जाते.
नदीच्या काठी, सागराच्या तीरावर, यज्ञाच्या ठिकाणी, वृक्षाच्या मुळाशी, उद्यानाच्या पुष्पवाटिकेत, पाण्याच्या मध्यभागी, गोठ्यात, रम्य ठिकाणी व राजरस्त्यावर कधीही मल विसर्जन करू नये. मंगळवारी केस व नखे काढू नयेत. तसेच नखेही कूरतडू नयेत. रविवारी व मंगळवारी शरीराला तेल लावू नये, वडील माणसाच्या आसनावर त्या व्यक्तीसोबत बसू नये. दुसऱ्याचे धन कधीही लूबाडू नये. राजा, ब्राह्मण, गुरुपत्नीसोबत कोणत्याही विषयावर वाद करणे टाळावे. पतीत, कुष्ठरोगी, चांडाळ, गोमंस भक्षक, लबाड, ज्ञानहीन, यांना टाळावे. दृष्ट, चरित्रहीन, बदनामी करणारे वाईट कर्म करणारे, भांडखोरवृत्तीचे दुराचारी अशा स्त्री, पुरुषांची सोबत सदाचारात बाधा आणते.
आपली सून, भावजय, आपली तरुण कन्या, अन्य युवती, गुरुपत्नी यांच्याशी भुवयांच्या हालचाली करून किंवा खाणाखुणा करून बोलू नये. तसेच यांच्याशी भांडण काढून निर्लज्जपणे बोलणे हे चूक आहे. रजस्वला असलेल्या गुरुपत्नीस नमस्कार करू नये, चुकून स्पर्श झाल्यास सचैल स्नान करावे. टरफल, विस्तव, हाड, भस्म, कापसाचे बोंड, गुरूचा ग्रंथ-संग्रह यावर कधीही पाय देऊ नये. वाळलेले, दुर्गंधीयुक्त, अपवित्र, दुसऱ्याने उष्टे केलेले, दुसऱ्यांसाठी शिजवण्यास आणलेले मासे कधी खाऊ नये.
आपल्यापेक्षा वयाने लहान असणारे पण नात्याने काका, मामा असणाऱ्यांच्या पाया पडून नमस्कार करू नये, मात्र ते येताच उभे राहावे, त्यांना बसण्यास आसन द्यावे व त्यांच्या समोर हात जोडून उभे राहावे. हाच भरपूर सत्कार व सदाचाराला धरूर आहे. अंगाला तेल लावलेल्या, उष्ट्या तोंडाने बसलेल्या, अंगावर ओले कापड असलेला, रोगग्रस्त, उद्विग्न, ओझे वाहून नेत असलेल्या अवस्थेत असणाऱ्या वंदनीय पुरुषांना सुद्धा, नमस्कार करू नये. वंदनीय पुरुषांनाही ते शुद्ध स्थितीत असतानाच नमस्कार करावा तेच सदाचाराला योग्य ठरते. दोन्ही पाय ओले ठेवून झोपू नये. पाय न धुता भोजन करणे, अंधाऱ्या जागेत झोपणे, अंधारात जेवणे, या गोष्टी नाशाला कारणीभूत आहेत.
पश्चिम व दक्षिणेकडे तोंड करून दात घासू नये. उत्तर व पश्चिमेकडे तोंड करून झोपू नये, त्यामुळे ब्रह्महत्तेच्या पापाचा भागीदार होतो व आयुष्य कमी होते. पूर्व आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपावे हे प्रशस्त आहे. पूर्वेकडे तोंड करून जेवल्याने आयुष्य वाढते. दक्षिणेकडे तोंड करून जेवल्याने यशाची वृद्धी होते. पश्चिमेकडे तोंड करून जेवल्याने संपत्तीचा नाश होतो. उत्तरेकडे तोंड करून जेवल्याने यशाचा नाश होतो. देवांचे जेवणे एकदा, मनुष्य दोन वेळा, प्रेत व राक्षस तीन वेळा, व अधर्मी चार वेळा जेवतो. भरपूर दान करणे, गोड भाषा आणि देवांचे पूजन, अतिथींना तृप्त करणे, या गोष्टींमुळे स्वर्गप्राप्ती होते, तर चिक्कूपणा, स्वजनांची निंदा, मळकट कपडे घालणे, नीच वृत्तीच्या माणसाविषयी भक्ती बाळगणे, रागीटपणे कटू व कठोर बोलणे, ही नरकवासी होण्याची लक्षणे आहेत.
जो मनुष्य सदाचाराच्या लक्षणांचे महत्त्व श्रवण करतो, लोकांना ऐकवतो, त्याला सदाचाऱ्यांची पुण्य फले प्राप्त होतात. पापापासून मुक्त होऊन तो अत्यंत शुद्ध होऊन स्वर्गापासून कधीही ढळत नाही, असे पद्मपुराणात सांगितले आहे.