Sunday, March 29, 2026

Maan ki Baat, Narendra Modi : "मन की बात"मधून पंतप्रधानांचे ऊर्जा संकटावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

Maan ki Baat, Narendra Modi :

नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना पुन्हा एकदा अफवांकडे दुर्लक्ष करून एकता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, हा मार्च महिना जागतिक पातळीवर खूपच उलथापालथींचा होता. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे, की भूतकाळात कोविडमुळे साऱ्या जगाला दीर्घकाळ अनेक अडचणींमधून जावं लागलं. आपल्या सगळ्यांनाच अपेक्षा होती की, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर जग नव्या दमानं प्रगतीच्या वाटेवर पुढे जात राहील. पण जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सतत युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती उत्पन्न होत राहिली. सध्या आपल्या शेजारी एक महिन्यापासून भीषण युद्ध चालू आहे. आपल्या लक्षावधी कुटुंबांचे सगे-सोयरे या देशांमध्ये राहतात, विशेषतः आखाती देशांमध्ये काम करतात. अशा एक कोटींहून अधिक भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्याबद्दल, मी आखाती देशांना विशेष धन्यवाद देतो.

ज्या भागात आत्ता युद्ध चालू आहे, तो भाग आपल्या ऊर्जा- गरजा भागवणारं खूप मोठं केंद्र आहे. त्यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत संकटाची परिस्थिती निर्माण होत आहे. आपले जागतिक संबंध, निरनिराळ्या देशांकडून मिळत असलेला सहयोग, आणि गेल्या दशकभरात उभं राहिलेलं देशाचं सामर्थ्य, यांच्या बळावर भारत या परिस्थितीचा नेटानं सामना करत आहे.

हा निश्चितच आह्वानात्मक काळ आहे. 'मन की बात'च्या माध्यमातून मी आज सर्व देशवासीयांना पुन्हा एकदा आग्रह करेन, की आपल्याला एकजुटीनं या आह्वानात्मक स्थितीतून बाहेर पडायचं आहे. जे लोक याही बाबतीत राजकारण करत आहेत, त्यांनी राजकारण करू नये. हा देशाच्या १४० कोटी देशवासीयांच्या हिताशी संबंधित विषय आहे, आणि यामध्ये स्वार्थाने बरबटलेल्या राजकारणाला अजिबात थारा नाही. अशा स्थितीत जे लोक अफवा पसरवत आहेत, ते देशाचं खूप मोठं नुकसान करत आहेत. मी सर्व देशवासीयांना आवाहन करेन की त्यांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये. सरकारकडून आपल्याला सातत्याने जी माहिती दिली जात आहे तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिच्यावरच विश्वास ठेवून कोणतंही पाऊल उचला. मला दर वेळेप्रमाणेच याही वेळी खात्री आहे, की जसा आपल्या देशाने 140 कोटी देशवासीयांच्या सामर्थ्यावर जुन्या संकटांचा पाडाव केला होता, तसं यावेळीही आपण सर्व मिळून या अवघड परिस्थितीतून अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर पडू.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशाच्या हस्तलिखित वारशाच्या जतनकार्यात जनतेच्या सहभागाचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, 'ज्ञान भारतम' उपक्रमांतर्गत हस्तलिखिते जतन केली जात आहेत आणि त्यांच्याशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे. या उद्देशासाठी एक ॲपदेखील विकसित करण्यात आले आहे. त्यांनी लोकांना त्यांच्या ताब्यात असलेल्या जतन केलेल्या हस्तलिखितांविषयी माहिती देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी देशातील खेळांबद्दल वाढता उत्साह आणि त्यातील कामगिरीचाही उल्लेख केला.देशभरच्या क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा महिना एकदम जोशपूर्ण आणि उत्साही राहिला आहे. भारतानं जेव्हा टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात आनंदाच्या लाटा उसळल्या. आपल्या संघाच्या या शानदार यशाचा आपल्या सर्वांना खूप अभिमान वाटतो. गेल्या महिन्याअखेरीस कर्नाटकात हुबळीमध्ये एक खूपच रोमहर्षक सामना बघायला मिळाला. हा सामना जिंकून जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट टीमनं रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. सर्वाधिक आनंदाची गोष्ट ही की जवळपास सात दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या टीमनं पहिल्यांदा रणजी करंडक जिंकला. हे अभूतपूर्व यश म्हणजे, खेळाडूंनी अनेक वर्षं सातत्याने केलेल्या कष्टांचं फळ आहे. संघाचा कर्णधार पारस डोगरा यानं अद्भुत कौशल्य दाखवलं. आपल्या नेतृत्वाने त्यानं या विजयात अभूतपूर्व योगदान दिलं. रणजीच्या सीझनमध्ये 60 गडी बाद करणारा काश्मीरचा तरुण गोलंदाज आकिब नबी याच्याही कामगिरीचा आज देशात बोलबाला आहे. या विजयामुळे संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गाबरोबरच जम्मू-काश्मीरची जनताही अतिशय रोमांचित झाली आहे. क्रिकेटच्या मैदानातल्या या शानदार कामगिरीमुळे तिथल्या तरुणांमध्ये खेळांप्रती उत्साह अधिकच वाढला आहे. यामुळे येत्या काळात अनेक तरुणांना क्रीडाक्षेत्र आपलंसं करण्यासाठी प्रेरणा मिळेल. जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये खेळांविषयी कमालीची जोशभावना आहे. आता हे मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचं केंद्रही होत चाललं आहे याचा मला आनंद आहे. खेलो इंडिया हिवाळी खेळांसाठी गुलमर्गनं तर आधीच आपली ओळख निर्माण केली आहे. फुटबॉलसारखे खेळही इथल्या तरुणांमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. येत्या काळातही जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंच्या विजयपताका अशाच फडकत राहतील अशी मला आशा वाटते.

मी नेहमी म्हणतो - जो खेळेल तो फुलेल. पूर्वी फारशा लोकप्रिय नसलेल्या खेळांनाही आता आपल्या देशाचे तरुण आपलंसं करत आहेत, हे बघून मला आनंद वाटतो. गुलवीर सिंह या उत्तर प्रदेशच्या प्रतिभाशाली अॅथलीटने अशाच एका खेळात कमाल करून दाखवली आहे. अगदी काही आठवड्यांपूर्वीच न्यूयॉर्क सिटी हाफ मॅरेथॉनमध्ये तिसरा क्रमांक पटकावून त्यानं इतिहास घडवला आहे. एका तासापेक्षाही कमी वेळात हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ॲथलीट ठरले आहेत. आपली स्क्वाश खेळाडू कन्या अनाहत सिंह हिनं स्क्वाश ऑन फायर ओपनच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपदावर नाव कोरलं. अवघ्या सतरा वर्षांच्या वयातच तिनं हे यश मिळवलं. याबरोबरच पीएसए जागतिक क्रमवारीत अव्वल २० मध्ये स्थान मिळवणारी ती सर्वात कमी वयाची आशियाई महिला खेळाडू ठरली आहे. मला अस्मिता अॅथलॅटिक्स लीग बद्दलही कळलं आहे. यात ८ मार्चला महिला दिनानिमित्त अनेक स्पोर्टिंग इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. लीग मध्ये जवळपास दोन लाख मुलींनी भाग घेतला. देशात होत असलेल्या या क्रीडाक्रांतीमध्ये भारताची स्त्रीशक्ती महत्त्वाची भूमिका निभावत आहे, हे बघून छान वाटतं.

पंतप्रधानांनी निरोगी जीवनशैलीच्या महत्त्वावर जोर दिला. त्यांनी नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहाराच्या गरजेवर भर दिला. एका प्रसंगी, त्यांनी सांगितले की त्यांनी इंस्टाग्रामवरील कंटेंट क्रिएटर युवराज दुआ यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला, ज्याचा त्यांच्या वडिलांवर सकारात्मक परिणाम झाला आणि त्यांनी साखरेचे सेवन कमी केले.

त्यांनी बंगळूरु येथील 'प्रयोग इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन रिसर्च'च्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, ही संस्था मुलांना विज्ञानातील व्यावहारिक अनुभवांमध्ये गुंतवून ठेवत आहे. त्यांनी नागा समाजाच्या 'मोरुंग' प्रणालीचाही उल्लेख केला, जी परंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधते.

पंतप्रधानांनी उन्हाळा लक्षात घेऊन जलसंधारणाच्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला. त्यांनी त्रिपुरातील वांगमुन गाव, छत्तीसगडमधील कोरिया जिल्हा आणि तेलंगणातील मुधिगुंटा गाव यांची उदाहरणे दिली, जिथे पावसाचे पाणी आणि भूजल वाचवण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधानांनी मच्छिमारांचे राहणीमान गुणात्मकदृष्ट्या सुधारण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, या क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहेत आणि मच्छिमार आत्मनिर्भर होत आहेत.

पंतप्रधानांनी माहिती दिली की, वाराणसीमध्ये नुकताच एका तासात २,५१,००० हून अधिक रोपे लावून एक जागतिक विक्रम प्रस्थापित झाला आहे. दरम्यान, नागालँडमधील चिझामी गावातील महिला १५० हून अधिक पारंपरिक बियाण्यांच्या जातींचे जतन करत आहेत. सामूहिक प्रयत्नांतून, ही बियाणे एका सामुदायिक बीज बँकेत जतन केली जात आहेत.

'प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने'च्या माध्यमातून देशभरातील लोकांच्या जीवनात घडवून आणल्या जात असलेल्या सकारात्मक बदलांच्या विषयाचाही त्यांनी समावेश केला.

'माय इंडिया' उपक्रमांतर्गत युवकांना राष्ट्रउभारणीशी कसे जोडले जात आहे, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. याच्या माध्यमातून, नुकत्याच पार पडलेल्या 'बजेट क्वेस्ट'मधून युवकांची मते समोर आली, जी देशाच्या विकासातील त्यांच्या सक्रिय सहभागाचे प्रतिबिंब आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा