इस बातका वादा कर लो...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे 


वर्ष होते १९६६, म्हणजे बरोबर ६० वर्षांपूर्वीचे! सिनेमाचे नाव अत्यंत गूढ आणि उत्सुकता वाढवणारे - ‘ये रात फिर ना आयेगी.’ दिग्दर्शक होते ब्रिज सदाना आणि निर्माते - महेश आणि मुकेश भट. प्रमुख भूमिकेत विश्वजीत (सुरज), शर्मिला टागोर,(किरण) मुमताज, (रिता) पृथ्वीराज कपूर, हेलन, असित सेन (अभिनेता) आणि बी. एम. व्यास. कथा पुनर्जन्माची म्हणता येईल अशी पण चमत्कारिक किंवा खरे तर अतृप्त आत्म्याच्या अगदी वेगळ्याच जीवनप्रवासाची.


रिता आणि राकेशला पुराणवस्तूसंशोधन खात्याच्या उत्खननात एक मानवी सांगाडा सापडतो. नंतर रीताचे त्याच विषयातील प्राध्यापक असलेले वडील (पृथ्वीराज कपूर) यांना कळते की तो सांगाडा २००० वर्षांपूर्वी मृत झालेल्या किरण नावाच्या मुलीचा आहे. नंतर मात्र अत्यंत गूढरीत्या किरण या जगात सदेह अवतीर्ण होते आणि रीताच्या आसपास वावरू लागते. याचे कारण म्हणजे तिचे तिच्या तत्कालीन प्रियकराशी पूर्ण होऊ न शकलेले मिलन! तिचा अतृप्त आत्मा प्रियकराला शोधत परत आलेला असतो. तिचा त्या जन्मातील प्रियकर आता एक चित्रकार ‘सुरज’, असतो. तोच रिताचा प्रियकर निघतो! असे हे गुंतागुंतीचे कथानक. गूढ आणि उत्कंठा वाढवणारे! मुळात सिनेमा एक अधुरी राहून गेलेली प्रेमकथा, संपूर्ण चित्रीकरण जुनी हवेली, हिरवेगार डोंगर-दऱ्या अशा पार्श्वभूमीवर झालेले आणि त्यात मुद्दाम कृष्णधवल रंगात केल्याने पुनर्जन्म, मृत व्यक्तीचे पुन्हापुन्हा दर्शन या गोष्टी सहज प्रस्थापित झाल्या. ओ.पीं.चे संगीतही एकंदर वातावरणाला पोषक ठरले.


सिनेमात हेलन आणि मुमताज इतक्या सुंदर दिसत होत्या, की दोघींवरून नजर हटत नाही. गाणी होती एस. एच. बिहारी आणि अजीझ कश्मिरींची. नेहमीप्रमाणे ‘ठेके’दार संगीत होते ओ. पी. नय्यर यांचे. ‘ये रात फिर ना आयेगी’ची आठही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली. त्यात आशाताईनी गायलेले ‘यही वो जगह हैं, यही वो फिझा हैं, यहाँपर कभी आप हमसे मिले थे’, आणि ‘मेरा प्यार वो हैं, मरकर भी तुमको, जुदा अपनी बाहोसे होने ना देगा’ रसिकांना विशेष आवडली. मधुमती आणि हेलनवरचे ‘हुजुरेवाला, जो होंगी इजाजत, तो हम ये सारे जहांसे कह दे?’ हे आशाताई आणि मिनू पुरुषोत्तम यांनी गायलेले गाणे तर ‘वार्षिक बिनाका’त सर्वात लोकप्रिय गाण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वाजले. सिनेमाबद्दल दोन गमंतीशीर आठवणी सांगितल्या जातात. एका दृश्यात शर्मिला टागोर विश्वजीतला थप्पड मारते असा प्रसंग होता. त्याचे चित्रीकरण सुरळीत पार पडलेही! पण नंतर दुपारच्या जेवण्याच्या वेळेस चित्रीकरणाच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका लहान मुलाने येऊन शर्मिलाला थप्पड लगावून दिली. नंतर कळले तो विश्वजीतचा ४ वर्षांचा मुलगा ‘प्रोसेनजीत’ होता. वडिलांच्या अपमानाचा बदला त्या बंगाली सुपुत्राने ‘जशास तसा’ घेतला होता. (नक्की त्याचे खरे नाव प्रसन्नजीत असायला हवे, पण बंगाली नावांच्या उच्चारांचे कुणी सांगावे?) पुढे प्रोसेनजीत एक लोकप्रिय बंगाली अभिनेता झाला. दुसरी आठवण म्हणजे दिग्दर्शकाना शेवटच्या दृश्यात शर्मिलासाठी पांढरी साडी हवी होती. ती ऐनवेळी मिळेना. मग निर्मात्यांच्या बहिणीची साडी शर्मिलाला उसनी मागून देण्यात आली. असे गंमतीने सांगितले जाई की ती साडी मूळ मालकिणीला कधीच परत मिळाली नाही.


एका जुन्या शानदार हवेलीच्या आसपास आणि प्रचंड खोल डोंगरदऱ्यांच्या पार्श्वभूमीवरच किरण सुरजला भेटत असते. एकदा तो तिला थांबण्याचा खूप आग्रह करतो, पण ती उद्या भेटेन असे सांगून निघू लागते. त्यावेळी रफीसाहेबांच्या रोमँटिक रेशमी आवाजात दिग्दर्शकांनी त्याच्या तोंडी एक सुंदर गाणे दिले होते. सोबत किरणसाठी आशाताईंचा मधाळ आवाज होता. आपल्या सुंदर प्रियेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराचे हळवे भाव अजिझ कश्मिरींनी लीलया कागदावर उतरवलेले होते-


‘फिर मिलोगे कभी इस बातका वादा कर लो.
हमसे इक और मुलाकातका वादा कर लो.’


खरे तर ही प्रत्येक प्रेमकथेतल्या सुरुवातीच्या मंतरलेल्या दिवसांची कहाणी असते. जगातली अनेक बंधने पाळून होणाऱ्या त्या भेटींना वेळेची मर्यादा असल्याने सतत एक ओढ, एक अतृप्ती ठेवूनच प्रत्येक निरोप होतो. वेळेच्या या मर्यादेमुळेच तर दोघांनाही ‘भेटीत तुष्टता मोठी’ वाटत असते. पण हे सगळे लक्षात येण्याची ती वेळच नसते. दोघेही प्रत्येक भेटीसाठी आतुरच असतात, म्हणून एका भेटीच्या शेवटी प्रत्येकवेळी एकमेकांकडून पुढच्या भेटीचे वचन मागत असतात. कितीही बोलणे झाले तरी मनाचे समाधान झालेले नसते. दोघानाही मनातून भेट पूर्ण झाली नाही असेच वाटत असते. देव आनंद, साधनाच्या ‘हम दोनो’(१९६१) मधील महंमद रफी आणि आशाताईंच्या खेळकर आवाजातल्या ‘अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही.’ सारखी हुरहूर प्रियकर प्रेयसीला जतावून सांगत असतो आणि प्रेयसी मात्र आपल्याही मनात त्याच भावना असल्या तरी त्या व्यक्त न करता ‘त्याने’ केलेल्या अजीजीमुळे सुखावत असते. किरणच्या त्या भेटीत मात्र बिचारा सुरज उद्या ‘अगदी थोडा वेळ का होईना पण नक्की भेटशील असे वचन मला दे’ म्हणून तिला विनवत असतो -


‘दिलकी हर बात अधूरी है, अधूरी है अभी,
अपनी एक और मुलाकात जरूरी है अभी.
चंद लम्होंके लिये साथका वादा कर लो,
फिर मिलोगे कभी...’


किरण मात्र सुरजला विचारते ‘तू मला तुझ्या हृदयातले इतके सुंदर रहस्य आताच कशाला सांगतोस? रोज मला एक नवे प्रेमगीत, इतके मधुर संगीत का ऐकवतोस? अरे मी तर तुझ्या प्रेमाच्या समुद्रात अगदी बुडाले आहे आणि तू मात्र मला दूर किनाऱ्यावरून साद घालतो आहेस.’ तिने नकळत अशी प्रेमाची उघड कबुली दिली तरीही तिचे स्त्रीसुलभ सावधपण लपत नाही. ती धीटपणे विचारते, ‘जिवलगा, तुझ्या प्रेमाची आजसारखी ही उत्कटता नंतरही अशीच राहील का? तसे मला आजच वचन देशील ना?’


‘आप क्यों दिलका हसीं राज़ मुझे देते हैं,
क्यों नया नग्म़ा, नया साज मुझे देते हैं,
मैं तो हूँ डूबी हुई प्यारके तूफ़ानोंमें,
आप साहिलसेही आवाज़ मुझे देते हैं.
कल भी होंगे यही जज़बात ये वादा कर लो.
हमसे इक और मुलाकातका वादा कर लो.’


जुन्या काळातले निवांत वातावरण, सुखीशांत जीवन कल्पनेने अनुभवायचे असेल, तर रहस्याचा ताण निर्माण करतानाही मनाला सैलावणारे असे चित्रपट पाहावेत.

Comments
Add Comment

अक्कलहुशारीने दृश्याचे चित्रीकरण

स्मृतिपटल : अनिल तोरणे  ‘बाजी’, ‘जाल’, ‘आरपार’, ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवीं का चांद’, ‘काला बाजार’,

तुका म्हणे ऐशा नरा...

प्रासंगिक : भागा वरखडे अलीकडच्या काळात नगर आणि नाशिक जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे तसेच देशभरात विविध ‘बाबां’वर

सदाचार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पद्मपुराणानुसार एकदा नारदाने ब्रह्मदेवांना सदाचार म्हणजे काय असा प्रश्न

कृत्रिम बुद्धिमत्ता : शाप की वरदान?

तंत्रज्ञान : प्रा. प्रवीण पांडे मित्रांनो संगणक आणि यंत्रमानव या विषयांवर सातत्यपूर्णतेने होणाऱ्या संशोधनाने

तुमचं छोटंसं हसू बदलू शकतं मुलांचं आयुष्य

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण चांगले कपडे घालतो. स्त्रिया आकर्षक अलंकार घालतात,

एक गोड आठवण

नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाड मी विश्वकोशाची अध्यक्षा होते,तेव्हा वाईला प्रत्येक महिन्यात माझा दहा दिवस