Sunday, March 29, 2026

मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! दोन नव्या मेट्रो मार्गिका अखेर सेवेत

मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! दोन नव्या मेट्रो मार्गिका अखेर सेवेत

मुंबई : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो प्रकल्पांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले (मानखुर्द) मेट्रो २B या दोन महत्त्वाच्या मार्गिकांच्या पहिल्या टप्प्यांचे लोकार्पण आता निश्चित झाले असून, येत्या ३ एप्रिलपासून या मार्गांवर मेट्रो धावणार आहे.

प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली

दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण होऊनही उद्घाटन रखडल्याने प्रवाशांना सेवेचा लाभ घेता येत नव्हता. मात्र आता या दोन्ही टप्प्यांना हिरवा कंदील मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो ९ अंतर्गत दहिसर ते काशीगाव, तर मेट्रो २B अंतर्गत डायमंड गार्डन ते मंडाले या टप्प्यांवर सेवा सुरू होणार आहे.

राजकीय आणि प्रशासकीय कारणांमुळे उशीर

या मार्गिकांना सुरक्षा प्रमाणपत्र मिळूनही काही महिन्यांपासून उद्घाटन लांबणीवर पडले होते. निवडणूक आचारसंहिता आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे हा विलंब झाला असून अखेर आता ३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचीही हा उदघाटनाला उपस्तिथी असणार आहे.

मुंबईच्या मेट्रो नेटवर्कला मोठी भर

या दोन्ही मार्गिका सुरू झाल्यानंतर मुंबईतील कार्यरत मेट्रो मार्गिकांची संख्या सहा होणार आहे. विशेष म्हणजे, मेट्रो ९ च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यालाही पहिल्यांदाच मेट्रो सेवा मिळणार आहे.

बीकेसीसाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाचीही घोषणा

याच कार्यक्रमात बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाचे भूमिपूजनही होणार आहे. वांद्रे पूर्व ते कुर्ला दरम्यान सुमारे ८.८ किमी लांबीचा हा प्रकल्प उभारला जाणार असून, भविष्यातील शहरी वाहतुकीसाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे.

नवीन मेट्रो मार्गिकांमुळे पश्चिम उपनगर आणि पूर्व मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि किफायतशीर होणार आहे. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment