मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता प्रोत्साहन मिळावे म्हणून महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना तात्पुरता मंडप उभारण्यासाठी नि:शुल्क परवानगी दिली जाणार आहे. तसेच महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास, प्रथम प्राधान्य ’ या तत्वावर फक्त पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनाच आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मूर्तिकारांना हव्या असलेल्या विविध परवानग्यांसाठी संगणकीय प्रणालीवर ‘एक खिडकी योजना’ ही शुक्रवार, २७ मार्च २०२६ पासून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे श्रीगणेशोत्सवासह नवरात्रौत्सवातील मूर्ती घडविण्यासाठी देखील १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मूर्तिकार अर्ज करू शकणार आहेत. तसेच दिनांक २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत या परवानगीची कालमर्यादा राहणार आहे. मूर्तिकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता मार्गदर्शक बाबी स्पष्ट करणारे परिपत्रक बृहन्मुंबई महानगरपालिकेने नुकतेच निर्गमित केले आहे.
श्रीगणेशोत्सव सन २०२६ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यावर महानगरपालिकेचा संपूर्ण भर आहे. यासाठी आतापासून नियोजन व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून निरनिराळ्या सेवा-सुविधा पुरवितांना पर्यावरणपूरक बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. हे लक्षात घेता सन २०२६ मधील श्रीगणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी उत्सवांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने मूर्तिकारांसाठी तात्पुरते मंडप उभारणे व अन्य बाबींकरीता परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.
कुठल्या संकेतस्थळावर जावून माहिती घ्याल
- सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मूर्ती घडविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारण्याकरीता परवानगीची प्रक्रिया एक खिडकी योजनेद्वारे संगणकीय प्रणालीमार्फत (ऑनलाईन) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (https://portal.mcgm.gov.in) विभागीय सहायक आयुक्त व परिमंडळ उप आयुक्त यांच्यामार्फत पार पाडण्यात येईल.
- सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मंडपांकरीता अर्ज सादर करताना मागील वर्षांची परवानगीची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक.
-पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून विभाग स्तरावर महानगरपालिकेच्या उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास, प्रथम प्राधान्य’ या तत्वावर केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांस आवश्यक ती जागा विनामूल्य, पण त्यासाठी अर्जदार स्वत: मूर्तिकार असणे अनिवार्य.
- पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याकरिता मूर्तिकारांना विनामूल्य शाडू माती तसेच पर्यावरण विभागामार्फत मूर्तिकारांना विनामूल्य नैसर्गिक /पर्यावरणपूरक रंग उपलब्धतेनुसार पुरविण्यात येणार.
- मूर्तिकारांना मंडपाची परवानगी देताना सदर परवानगी केवळ मूर्तिकारांसाठी असेल. या ठिकाणी केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यात येईल. तेथे 'पीओपी" मूर्ती घडविता येणार नाही. तसेच सदर परवानगीचा उपयोग कोणत्या प्रकारची मूर्ती विक्रीसाठी करता नाही. तसे स्वयंघोषित हमीपत्र देखील महानगरपालिकेकडे सादर करावे लागणार.
- मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते / फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असेल.






