अक्कलहुशारीने दृश्याचे चित्रीकरण

स्मृतिपटल : अनिल तोरणे 


‘बाजी’, ‘जाल’, ‘आरपार’, ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवीं का चांद’, ‘काला बाजार’, ‘साहिब बीबी और गुलाम’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि नृत्यदिग्दर्शक गुरू दत्त हे एक अत्यंत चांगले गृहस्थ होते. इतकेच नव्हे तर आपल्यासमवेत काम करणारे इतर कलावंत आणि कनिष्ठ कलावंतांच्या समस्यांचीही ते घरातील प्रमुख व्यक्तीसारखी दखल घेत असत. चित्रपट निर्माण होत असताना जर कोणी व्यवस्थित काम करीत नसेल किंवा चूक करीत असेल तर ते त्या व्यक्तीवर सर्वांदेखत रागावत नसत किंवा तिला अपमानित करत नसत. उलट तो विशिष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री एकच चूक पुन:पुन्हा का करीत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असत. ‘प्यासा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नवोदित अभिनेत्री वहिदा रहमान एका दृश्याचे चित्रीकरण करत असताना आपले संवाद नीट म्हणू शकत नव्हत्या. पुन:पुन्हा चित्रीकरण करावे लागत असल्याने (रिटेक) गुरू दत्त यांनी चित्रीकरण थांबविले आणि...


१९५७ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्यासा’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच्या काळातील ही घटना आहे. त्या चित्रपटात गुरू दत्त यांच्या व्यतिरिक्त माला सिन्हा, वहिदा रहमान, कुमकुम, लीला मिश्र, महमूद, जॉनी वॉकर आदी कलावंतांच्या भूमिका होत्या. दिग्दर्शन गुरू दत्त यांचेच होते. एका दृश्याचे चित्रीकरण केले जात होते. त्यानुसार प्रथमच गुलाबो (वहिदा रहमान) चित्रपटाचा नायक विजयला (गुरू दत्त) भेटते. नंतर विजय निघून जातो पण त्याचे काही कागद गुलाबोकडे असतात. ते घेऊन ती त्याच्या मागे विजय, विजय, विजय अशा हाका मारीत जिन्यावरून धावत खाली येते. त्यावेळी तिची मैत्रीण जूही (कुमकुम) मागून येते. जूही तिला विचारते, काय झाले? त्यावर गुलाबो तिला म्हणते की मी हे जे गीत गात होते ते विजयने लिहिलेले आहे...! या दृश्याचे चित्रीकरण केले जात असताना वहिदा रहमान जेव्हा जिन्यावरून धावत खाली येते तेव्हा धावल्यामुळे त्यांना दम लागत असे आणि त्यामुळे त्या आपले संवाद व्यवस्थित म्हणू शकत नव्हत्या. हे एकच दृश्य पुन:पुन्हा चित्रित करावे (रिटेक) लागत होते. यामुळे नवोदित वहिदा रहमान मनातून कमालीच्या खजिल झाल्या होत्या. त्यांना वाटत होते, की संवाद लांबलचक नसतानाही आपण तो म्हणू शकत नाही, असे सेटवर उपस्थित असलेल्या लोकांना वाटेल. तुम्हाला कोठे अडचण वाटत आहे, असे गुरू दत्त त्यांना वारंवार विचारीत होते पण वहिदा रहमान काहीच उत्तर देत नव्हत्या. गप्पच बसत होत्या. या दृश्याचे बरेचदा चित्रीकरण केल्यानंतर बऱ्याच वेळाने गुरू दत्त म्हणाले, थोडा वेळ थांबू या.


काही त्रास होत असेल तर मला सांगा, असे म्हणून गुरू दत्त सेटवर असलेल्या वहिदा रहमान यांच्या मातोश्रींच्या जवळ जाऊन त्यांना म्हणाले, मम्मी हे दृश्य फार अवघड तर नाही; पण त्यांना (वहिदा) कसला त्रास होतोय? गुरू दत्त यांनी अशी पृच्छा केल्यावर मातोश्री त्यांना म्हणाल्या, की कधी कधी तिचा श्वास अडतो त्यामुळे ती संवाद म्हणू शकलेली नाही. वहिदा रहमान यांना अॅलर्जीमुळे दम्याचा त्रास होतो हे समजल्यावर गुरू दत्त त्यांच्या मातोश्रींना म्हणाले, मम्मी आपण हे मला आधीच सांगावयास हवे होते. बिचाऱ्या उगीचच पुन:पुन्हा वरून खाली धावत येत आहेत आणि यामुळे मी पुरता त्रासून गेलो आहे! इतक्या वेळा चित्रीकरण होऊनही हे दृश्य अद्याप व्यवस्थित चित्रित (ओके) झालेले नाही.


वहिदा रहमान यांच्या मातोश्रींशी बोलणे झाल्यावर नेमके काय होत आहे हे गुरू दत्त यांच्या लक्षात आले. ते वहिदा रहमान यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाले, अहो तुम्हाला कसला त्रास होत असेल तर मला सांगा. तुम्ही सांगितले नाही तर मला कसे कळणार की तुम्हाला काय होते आहे ते! चला आता जेवणाची सुट्टी घेऊ आणि त्यानंतरच हे दृश्य चित्रित करू!


जेवणाची सुट्टी आटोपल्यावर पुन्हा चित्रीकरण सुरू झाले. वहिदा रहमान जिन्यावरून धावत खाली येतात ते दृश्य गट्रू दत्त यांनी चित्रित करून त्या ठिकाणी ते कापले. त्या दृश्याचे चित्रीकरण झाल्यावर ते वहिदा यांना म्हणाले, तुम्ही चार पायऱ्या वर चढून जा आणि त्या ठिकाणी थांबा. मी ‘अॅक्शन’ असे म्हटले की त्या चार पायऱ्यांवरून धावत खाली या आणि तुमचा संवाद म्हणा. असे केल्याने तुमचा श्वास अडकणार नाही ! गुरू दत्त यांनी तसे सांगितल्यावर वहिदा रहमान चार पायऱ्या वर चढून त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. गुरू दत्त यांनी ‘अॅक्शन’ असे म्हणताच त्या चार पायऱ्यांवरून धावत खाली आल्या आणि त्यांनी अत्यंत सहजपणे आपला संवाद म्हटला. अशा तऱ्हेने पुन:पुन्हा चित्रित करावे लागलेले ते दृश्य गुरू दत्त यांनी आपले डोके लढवून अगदी सहजगत्या चित्रित केले.

Comments
Add Comment

तुका म्हणे ऐशा नरा...

प्रासंगिक : भागा वरखडे अलीकडच्या काळात नगर आणि नाशिक जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे तसेच देशभरात विविध ‘बाबां’वर

सदाचार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पद्मपुराणानुसार एकदा नारदाने ब्रह्मदेवांना सदाचार म्हणजे काय असा प्रश्न

कृत्रिम बुद्धिमत्ता : शाप की वरदान?

तंत्रज्ञान : प्रा. प्रवीण पांडे मित्रांनो संगणक आणि यंत्रमानव या विषयांवर सातत्यपूर्णतेने होणाऱ्या संशोधनाने

इस बातका वादा कर लो...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे  वर्ष होते १९६६, म्हणजे बरोबर ६० वर्षांपूर्वीचे! सिनेमाचे नाव अत्यंत गूढ आणि

तुमचं छोटंसं हसू बदलू शकतं मुलांचं आयुष्य

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी आपण चांगले कपडे घालतो. स्त्रिया आकर्षक अलंकार घालतात,

एक गोड आठवण

नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाड मी विश्वकोशाची अध्यक्षा होते,तेव्हा वाईला प्रत्येक महिन्यात माझा दहा दिवस