Sunday, March 29, 2026

Ashok Kharat Case Update: खरात प्रकरणात न्यायालयात काय घडलं?, जाणून घ्या A to Z माहिती

Ashok Kharat Case Update: खरात प्रकरणात न्यायालयात काय घडलं?, जाणून घ्या A to Z माहिती

नाशिक: अशोक खरातच्या भोंदूगिरीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून नवनवे खुलासे समोर येत आहेत. खरातला २९ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करुन १ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातची चौकशी करण्यासाठी एसआयटीला (SIT) अधिक कालावधीची गरज असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.

पोलिसांच्या कडक बंदोबस्तात खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीचे तपास अधिकारी किरण सुर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, "आरोपी हा तपासात सहकार्य करत नाही. त्याने मोबाईलमध्ये अनेक नावे 'डमी' किंवा 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह केली असण्याची शक्यता आहे, ज्यात काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो. तसेच, पीडित महिलांना तो जे 'द्रव्य' किंवा पाणी पाजत होता, त्याबाबतही सखोल तपास करायचा आहे."

दुसऱ्या बाजूला आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध दर्शवला आहे. "मोबाईल जप्त केला आहे, क्लोन कॉपी मिळाली आहे, मग पुन्हा कोठडीची गरज काय? रिव्हॉल्व्हरचा परवानाही आरोपीकडे होता," असा दावा त्यांनी केला. परंतु पीडित महिलेचे वकील एम.वाय.काळे यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे आणि आरोपीच्या कृत्यामुळे पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून समाजाला न्याय मिळण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान आतापर्यंत खरातविरोधात १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात तर २ गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >