Saturday, March 28, 2026

एक गोड आठवण

एक गोड आठवण

नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाड

मी विश्वकोशाची अध्यक्षा होते,तेव्हा वाईला प्रत्येक महिन्यात माझा दहा दिवस मुक्काम असे. तिथे एक वसतिगृह होते. त्यात माझी खोली विशेष आवडती होती. त्या खोलीची उबच न्यारी होती. खरे तर पंखा नि एक पलंग, एक लिहिण्यासाथही टेबल नि एक खुर्ची. पण मला तो जामानिमा पुरेसा वाटे. मुख्य म्हणजे विश्वकोशाच्या कार्यालयाला लागून, जवळच ती खोली होती. खिडकीतून माझे टेबल सहज दिसे. मला आनंद होई. मराठी विश्वकोशाचे १७, १८, १९, २०, २१ हे ५ खंड मज हातून लिहिले गेले आणि ते सर्वच्या सर्व प्रकाशित झाले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांचा मानाने समावेश होता. आमचे मित्र आणि विश्वकोशाचे सदस्य मधुकर भावे साहेब सीएम साहेब यांना मिळवून देण्यासाठी मजसाठी खूप प्रयत्न करीत असत. वाई येथील १० दिवसांच्या (३-३-४ असे टप्पे) मुक्कामात मी पुढील कामाची आखणी आणि वाटणी करीत असे. माझे यजमान डॉ. वाड घराची जबाबदारी उतम सांभाळीत असत. त्यांचे उपकार न फिटणारे आहेत.

तर मुक्काम पोस्ट वाई!

एक दिवस मी माझ्या लाडक्या खोलीत आराम करीत होते. विश्वकोशाचे नोंद वाचन करून जरा थकले होते. चहा पिऊन जरा तरतरी येईल असे वाटले. मी गृहरक्षकांना विनंती केली की, मला कपभर गरमागरम चहा हवासा वाटतो आहे. करता का?’... “आत्ता देतो.” तो आनंदाने म्हणाला. तेवढ्यात खोलीत एक साधेसे गृहस्थ आले. त्यांच्या अंगावर पांढरी शुभ्र वस्त्रे होती. (मीही पांढऱ्या साड्याच वापरीत असे. अगदी कायम) “ मला विश्रांतीची गरज आहे फार.” ते सद्‌गृहस्थ म्हणाले. “अहो, पण मी ही खोली वापरते आहे ना.” मी म्हणाले. “आपण ना बाईसाहेब, माझी रूम वापरा.” “पण तुम्ही वापर न तुमची रूम.” “या खोलीची मला सवय आहे. तिची ऊबच न्यारी.” “क्षमा करा. मी ही रूम सोडणार नाही.” मी म्हटले. ते गृहस्थ थोडे घुटमळले. मग रुसून निघून गेले. पण मला चुटपूट लागली. तेवढ्यात माझा गृहरक्षक गाणे गुणगुणू लागला. पुन्हां पुन्हां! “असुनि खास माळक घरचा, म्हणति पावणा त्याला, परशता पाश दैवे ज्यांच्या, गळा लागला.” “हे एकच गाणे तुका गुणगुणत आहेस रे?” मी त्याला कुतुहलाने विचारले. “अहो बाईसाहेब, आपल्याकडे कोण आले होते? ठाऊक आहे का?” “कोण रे?” “प्रत्यक्ष सांगली कोल्हापूरचे महाराज आले होते हो आप्ळू‌आकडे.” “अरे पण मला कसं कळणार? मी त्यांना कधी पाहिलं नाही रे. कसं ओळखणार रे?” मी चुकचुकले. “अहो बाईसाहेब, ही सर्व मालमता महाराजांचीच आहे. त्यांनी मराठी विश्वकोशाला ती दान केली आहे.” “अरे बापरे! मला हे कसं कलावं?” मी चुटपुटले. फार अस्वस्थ झाले. रात्रीचे साडेअकरा झाले होते. महाराज कुठे आहेत?” “ते बाहेर रुसून बसले आहेत.” गृहरक्षक म्हणाला. मी पलंगावरून उठले. बाहेर गेले. “महाराज, क्षमा असावी. मी आपल्याला ओळखले नाही.” मी नम्रपणे म्हटले. “असू डे, असू डे. कशा ओळखणार तुम्ही? आता राजे मुकुट घालीत नाहीत की उत्तरीय परिधान करीत नाहीत.” “महाराज, आपण झोपा त्या खोलीत, जिथे मी निद्रा घेत होते.”“तुम्ही माझ्या खोलीत झोपाल?” “आनंदाने” ही गोष्ट उत्तम झाली.” ते आनाडले. कुठे आहे तुमची खोली?” मी विचारले. “चला बाईसाहेब, मी दाखवितो आपणांस.” गृहरक्षक आता उत्साहाने, आनंदाने तयार झाला. आणि मी महाराजांच्या खोलीकडे वळले. खोली कसली? महालच होता तो. संपूर्ण वातानुकूलित असा प्रशस्त, सुंदर महाल! तो बघून मी खुशम खुश झाले. “महाराजांना तुम्ही जिथे विश्राम करीत होता, तिच रूम खूप खूप आवडते.” गृहरक्षक म्हणाला. माझी गादी फटाफट स्वच्छ आणि घालून तो म्हणाला, “ झोपा बाईसाहेब निवांत.” आणि मी सुखे सुखे निद्राधीन झाले. अशी ही गोड आठवण !

Comments
Add Comment