जीवनगंध; पूनम राणे
समर्थ नगरामध्ये कालपासून सर्वांची जोरदार तयारी चालू होती. सारे नगर विद्युत रोषणाईने सजवले होते. नगराच्या द्वाराजवळ फुलांची तोरणे लावली होती. रांगोळ्या काढल्या होत्या. नेहमीपेक्षा आज नगरात सकारात्मक वातावरण होते. कारणही तसेच होते, आज चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती होती. नगरामध्ये छोटेसे मंदिर होते. मंदिराची सजावट करण्यात आली होती. स्वामींच्या चेहऱ्यावर सुहास्य दिसत होते. त्यांच्या डोक्यावर चांदीचा मुकुट, गळ्यात चांदीचा हार, रेशमी वस्त्र स्वामींना परिधान करण्यात आले होते. आज सकाळपासून स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग नगरात लागली होती. पाहता पाहता ही रांग मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचली होती. नगराव्यतिरिक्त इतर बाहेरील भक्तगण स्वामींचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते.
नगराच्या बाजूलाच एक शाळा होती. शाळा नुकतीच सुटली होती. विद्यार्थी आपल्या घरी निघाले होते. सेजल आणि सानिका दोघी मैत्रिणी रस्त्याने चालल्या होत्या. एवढ्यात भरधाव वेगाने एक ट्रक आला आणि सानिकाला धडक दिली. सानिका जोरात किंचाळली आणि खाली कोसळली. तिच्या डोक्याला मार लागला. ती बेशुद्ध पडली. सेजल वाचवा... वाचवा... म्हणून जोरात ओरडू लागली.
स्वामींचे दर्शन घेण्यासाठी लागलेल्या रांगेत दर्शन उभा होता. सानिकाचा आवाज ऐकताच तो रांग सोडून चपळाईने धावतच सानिकाच्या जवळ आला. त्याची चार चाकी गाडी होती. ताबडतोब सानिकाला उचलून गाडीत ठेवून हॉस्पिटलमध्ये निघाला. सानिकाला हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखल केलं. सेजलला त्याने सानिकाच्या घरचा मोबाइल नंबर विचारून ताबडतोब त्याने तिच्या पालकांना फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले. थोड्याच अवधीत सानिकाचे आई-बाबा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
ते दोघेही स्वामींचे भक्त होते. हॉस्पिटलच्या दारात येत असताना “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असे गाडीवर लिहिलेले दिसले. गाडीवर असलेल्या स्वामींच्या फोटोला नमस्कार करून, त्यांना विनंती करून धावतच ते दोघेही हॉस्पिटलमध्ये सानिकाजवळ आले. सानिकाच्या डोक्याला मुका मार लागला होता. आई... आई म्हणत ती शुद्धीवर आली. आपल्या आईला बिलगली. दोघांनी दर्शनचे आभार मानले व म्हणाले,” आज प्रत्यक्ष आपल्या रूपात स्वामींनी आम्हाला मोठ्या संकटातून वाचवले.
यावर दर्शन म्हणाला, “अहो आभार कसले मानता.” काही वर्षांपूर्वी असाच एका संकटात सापडलाे होतो. मलाही एका व्यक्तीने अशीच मदत केली होती. त्याचवेळी मी स्वामींजवळ संकल्प केला होता. आपण माझ्याकडून अशीच सेवा करून घ्या. ‘आज तो माझा संकल्प पूर्ण झाला.’
दर्शन तिथून निघाला तो थेट समर्थनगरमध्ये स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आला. स्वामींना नमस्कार केला. स्वामींच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. तो स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाला.






