Saturday, March 28, 2026

एका जिद्दी माणसाची गोष्ट

एका जिद्दी माणसाची गोष्ट

कथा;रमेश तांबे

नमस्कार बालमित्रांनो. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, एका क्रिकेटपटूची. आपल्या भारत देशाच्या दक्षिणेला श्रीलंका हा देश आहे. त्या देशात एक क्रिकेटपटू होऊन गेला. त्याचं नाव मार्वन अटापट्टू. मित्रांनो ही गोष्ट आहे त्याच्या जिद्दीची, मेहनतीची, त्याच्या ध्येयसक्तीची आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची. तर मित्रांनो, त्याचं असं झालं. मार्वनला क्रिकेट खेळायला खूप आवडायचं. तो तासनतास क्रिकेट खेळायचा. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने भरपूर धावा केल्या. त्याचं नाव संपूर्ण देशात झळकू लागलं. जसं प्रत्येक खेळाडूला आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करायचं असतं तसंच मार्वनलाही करायचं होतं. तो त्याच ध्येयाने, ध्यासाने झपाटलेला होता. श्रीलंकेच्या सर्वोच्च अकरा खेळाडूंत त्याला स्थान मिळवायचं होतं आणि शेवटी त्याला ती संधी लवकरच मिळाली. अखेर श्रीलंकेच्या संघात कसोटी खेळण्यासाठी त्याची निवड झाली. नव्हे नव्हे त्याने ती जागा स्वतःच्या जिद्दीवर आणि परिश्रमावर मिळवली.

पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. मार्वनला कसोटी खेळण्याची संधी मिळाली, पण दुर्दैवाने तो दोन्ही डावांत शून्यावर बाद झाला. दोन्ही डावांत अपयशी ठरल्याने त्याने लगेचच संघातले स्थान गमावले. कारण त्यावेळी श्रीलंका संघात स्थान मिळवण्यासाठी जबरदस्त स्पर्धा होती. मग मार्वन पुन्हा स्थानिक क्रिकेटकडे वळला, पण त्याला लवकर संधीच मिळाली नाही. पुढे संधी मिळाली ती तब्बल एकवीस महिन्यांनी! याही वेळी तो अपयशी ठरला. पहिल्या डावात शून्यावर, तर दुसऱ्या डावांत एक धाव करून माघारी परतला. आता मात्र अपयशी असा शिक्काच त्याच्या कपाळावर मारला गेला आणि तो संघाच्या बाहेर फेकला गेला. आता स्थानिक क्रिकेट खेळण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पुढे त्याला सतरा महिन्यांनी परत एकदा खेळण्याची संधी मिळाली, तर पुन्हा तो दोन्ही डावात शून्यावर बाद झाला आणि पुन्हा संघाच्या बाहेर फेकला गेला.

आता मात्र त्याची मित्रमंडळी, हितचिंतक, त्याच्या घरातले त्याला सल्ला देऊ लागले. क्रिकेट सोडून दे. तुला त्यात यश नाही. स्वतःचं जीवन असं वाया घालवू नकोस. दुसरे काहीतरी कर, असा फुकटचा सल्ला देऊ लागले. या सगळ्या अपयशाने आणि फुकटच्या सल्ल्याने मार्वन निराश जरूर झाला. पण खचला नाही. कारण क्रिकेट हा त्याचा ध्यास होता. क्रिकेट हेच त्याचे जीवन होते. क्रिकेटच त्याचा श्वास होता. अपयशावर मात करत, टीका आणि फुकटच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत तो स्थानिक क्रिकेट खेळू लागला आणि पुन्हा एकदा जिद्दीच्या, परिश्रमाच्या जोरावर त्याने संघात स्थान मिळवलं, तेही तब्बल छत्तीस महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर! तेव्हा त्याने पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावांत पंचवीस धावा केल्या.

तर बालमित्रांनो, लोकांची टीका सहन करीत, क्रिकेट सोडून देण्याचे सल्ले, टोमणे ऐकत तो जिद्दीने क्रिकेट खेळत राहिला. पुढे याच मार्वनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत नव्वद कसोटी सामन्यात तब्बल पाच हजार धावा केल्या. सोळा शतके, सहा द्विशतके आणि त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यात साडेआठ हजार धावादेखील केल्या आणि श्रीलंकेचा एक यशस्वी कर्णधार म्हणून तो निवृत्त झाला. हे सगळं यश त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरी धाव काढण्यासाठी सहा वर्षे लागल्यानंतर! सतत येणाऱ्या अपयशावर मात करत तो अथक प्रयत्न करत राहिला. लोक म्हणतात म्हणून त्याने क्रिकेटचा ध्यास सोडला नाही. लोकांच्या निंदेला कंटाळून नवीन क्षेत्र निवडलं नाही. मार्वनची जीवनकथा आपल्याला हेच सांगते की, जो स्वतःचं ऐकतो तोच जीवनात यशस्वी होतो.

Comments
Add Comment