Saturday, March 28, 2026

परीक्षा आल्या रे आल्या...

परीक्षा आल्या रे आल्या...

मनस्विनी; पूर्णिमा शिंदे

शैक्षणिक वर्ष जून ते मार्च, एप्रिल. प्रत्येक वर्षी नेहमीच येतो पावसाळा! तशा प्रत्येक वर्षी नेहमीच येतात परीक्षा. परीक्षा आणि आपलं जुनं नातं कायमचंच! पुन्हा पुन्हा परीक्षेची तयारी करायची असतेच सर्वांनाच! बालपणापासूनच ध्यानीमनी बसलेली, आठवणीत रुजलेली, परीक्षा आणि त्यात भीती, पोटात गोळा येण्यासारखी कसं होईल? काय होईल? कधी होईल? ही चिंता भेडसावणारी समस्या. आई-बाबा नव्हतो तेव्हाही आणि आता आई-बाबा झालो तेव्हाही. आपल्या मनाच्या तळघरात कायमची भीती बसलेली. आपली मुलं, त्यांचा अभ्यास त्यावर भवितव्य, भविष्य. खरं घरच जणू शाळा होऊन जातं. परीक्षेच्या दरम्यान सर्वांना अभ्यासाचे वेध लागतात. एक विलक्षण न दिसणारं पण जाणवणारं परीक्षेचं वातावरण निर्माण होऊन जातं. मुलांच्या उनाडक्या थांबतात, मुलांची मस्ती थांबते अशी परिस्थिती होते की शांत, अभ्यासमय आदर्श वातावरण, सारखं सतत अभ्यास करत राहणारी मुलं आणि त्यांच्या मागे लागणारे पालक. आज परीक्षेसाठी सगळे काम सोडून परीक्षामय होतात. परीक्षेचा राक्षस सगळ्यांनाच भेडसावतो.

तसे पाहिले तर कधीकाळी आपण सुद्धा जेव्हा जन्माला आलो, त्या पहिल्या श्वासापासून आजपर्यंत नेहमी परीक्षा देत आलोय. पावलोपावली! परीक्षा मग ती परिस्थितीची असेल, माणसांची असेल किंवा कोणती? आज, उद्या निवळेल ती भीती. मेहनत तसे फळ! असे आपण आपल्या स्वतःला समजावून सांगत असतो. अरे अभ्यास कर! अभ्यास कर तो शिळा होत नाही. रोज करत जा. पण बऱ्याचदा तहान लागल्याशिवाय विहीर खणत नसतात. मग शाळा असते. शिकवणी असते. सराव असतो. काही छंद असतात. अभ्यास असतो. मग आयत्यावेळी )घाबरायचं का? येऊन येऊन तरी काय येणार आहे? पुस्तकाबाहेरची नाहीच येणार? मग हे प्रश्न किती मोठे असतात. सुरुवातीला ते काही न सुटणारी कोडी नाहीच बुवा! या परीक्षेचा बागुलबुवा करू नका! सर्वप्रथम परीक्षेचे भूत, राक्षस डोक्यातून काढून टाका. भीती, पोटचा गोळा गेला की धाकधूक संपली. लांब दीर्घ श्वास घ्या, ध्यान करा. दोन मिनिटं डोकं शांत ठेवा. मग ती ऊर्जा आली की हातात पेपर आला रे आला की सोपे सोपे पहिले सोडवा! बरं ते सोडून झालं की मग मात्र कठीण प्रश्न सोडवू लागा. सातत्याने करत राहिलं तर कोणतीच गोष्ट अवघड नाही. यासाठी सराव महत्त्वाचा, परीक्षेपूर्वी सुंदर हस्ताक्षर आणि उजळणीची तयारी असायला हवी. सरावासाठी नमुना प्रश्नपत्रिका सोडवाव्यात आणि तेही वेळ लावून. मोजक्या शब्दांत संदर्भ, मुद्दे लिहा. प्रश्नांचे क्रमांक व्यवस्थित घाला. त्याचे उपप्रश्नही लिहा. डायरेक्ट उत्तरे लिहू शकता. ते लिहिताना विसरून काही शिल्लक ठेवू नका. तिथल्या तिथेच लिहा. उगाच अवांतर, फापटपसारा नको. मोजक्या शब्दांत मुद्देसूद मांडणी, संदर्भासहित स्पष्टीकरण उदाहरणे, दाखले द्या. प्रश्न क्रमांक घाला आणि चटकन सरासर उत्तर लिहीत जा. अवघड प्रश्न सोप्यानंतर हाताळा. जमेल तितका वेळ वाचवा. वेळेचे भान असू द्या. वाचून पाहा.

विसरून काही राहिले का? मुद्दे नीट लिहिलेत का? जर वेळ बोललास शिल्लक तर अजून एक-दोन जास्तीचे प्रश्न उत्तरे सुद्धा लिहा. काय असतं कधी एखादा चुकलाच तर गुण कमी पडायला नको. परीक्षा वेळेपूर्वी पुरवण्या बांधून घ्या. त्या पुरवण्यांवर आपला परीक्षा नंबर व्यवस्थित लिहा. बोर्डाची परीक्षा असेल तर हॉल तिकीटवरील नंबर पाहून घ्या. केंद्र लिहा. क्रमाने सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे व्यवस्थित टापटीतपणे मांडा. अक्षर समजेल असेच लिहा. पर्याय प्रयत्न करणे.

थांबला तो संपला. वर्षभर तयारी करत असाल, तर नक्कीच लागू होईल अन्यथा परीक्षा पूर्वीची तयारी असेल. तरी चालेल पण तयारी असायलाच हवी. परीक्षेला तोंड देताना रात्री-अपरात्री अभ्यास करणे, पहाटे उठून अभ्यास करणे यांनीही तब्येत बिघडते. भूक, झोप मंदावते आणि मानसिक, शारीरिक शक्ती कमी होते. यांच्यावर परिणाम होतो आणि अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो. त्यामुळे आपले लक्ष केंद्रित करा. जास्तीत जास्त पाणी प्या, ऊर्जा राहते, चैतन्य राहते, स्फूर्ती राहते आणि उन्हामध्येच परीक्षा आल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपले रक्षण होते. स्वतःचे रक्षक बना. मोठी होताना आत्मनिर्भर बनताना स्वावलंबी बना. हे सारं शिक्षकांना, आई-वडिलांना मोठे झाल्यावर विसरू नका. सर्व व्याप सहन करून ते आपल्या पाठी खंबीरपणे, आधार बनून मार्गदर्शक असतात. म्हणून प्रश्नपत्रिकेतील उत्तरांशिवाय जीवनातील परीक्षा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. जीवनामध्ये ठाम उभे राहायचे असेल, तर प्रयत्न, यश, विश्वास यांची तितकीच गरज असते. सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा! यशस्वी व्हा.

Comments
Add Comment