Saturday, March 28, 2026

नावात काय आहे...?

नावात काय आहे...?

प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ

एका अत्यंत नावाजलेल्या महत्त्वाच्या संस्थेत कार्यक्रमासाठी मी गेले होते. या कार्यक्रमात एक सहयोगी चर्चक होते त्यांचे नाव मी इथे उद्धृत करू इच्छित नाही. ‘विकास सरपोतदार’ हे काल्पनिक नाव आपण इथे घेऊ या! या सरपोतदारांना मी कधी भेटले नव्हते; परंतु त्यांचे नाव मात्र मी ऐकून होते. मी सभागृहात प्रवेश केल्यावर त्यांना भेटायला गेले. माझे नाव सांगितले आणि म्हटले, की मला खूप आनंद आहे की आज तुम्ही माझ्यासोबत एकाच व्यासपीठावर आहात! साहजिकच ते खूश झाले. त्यांच्या साहित्याविषयी मला बोलायचे होते की मला तुमची ही कथा, हा लेख आवडलेला आहे वगैरे म्हणून मी त्यांच्या बाजूलाच बसले. इतक्यात माझ्या मैत्रिणीने मला बाहेर बोलवले कारण कोणीतरी मला भेटायला आलेले होते. मी त्यांना म्हटले की मला तुमच्याशी बोलायचे आहे, पण आपण कार्यक्रमानंतर बोलू या आणि मी तिथून मला जे भेटायला सद्गृहस्थ आले होते त्यांच्याशी बोलायला निघून गेले. एका दृष्टीने मला कोणी तरी भेटायला आले. बरेच झाले कारण ते आपल्या हातातले कागद घेऊन बारकाईने काहीतरी वाचत होते आणि तसे थोडेसे तणावग्रस्तही दिसत होते. बाहेर आमच्या गप्पा रंगल्या होत्या आणि पुस्तक देवाणघेवाण, फोटोग्राफी असे काहीसे चालू राहिले. इतक्यात कोपऱ्यात काही माणसे जोराजोराने एकमेकांशी बोलण्याचा मला आवाज आला आणि स्वाभाविकपणे आमचे तिकडे लक्ष गेले. त्या कार्यक्रमाचे आयोजक, प्रायोजक आणि दोन-तीन माणसे काहीतरी बोलत होते. आवाज वाढता होता त्यामुळे परत परत तिकडे लक्ष जात होते. कार्यक्रमाची वेळ होत आली तसे मी सभागृहात परतले. तिथे गेल्यावर कळले की, ‘विकास सरपोतदार’ नावाचे आणखी एक गृहस्थ तिथे हजर झालेले आहेत. कहानी में ट्विस्ट...? म्हणजे मी ज्यांच्याशी बोलले त्यांचे साहित्य वाचलेले आहे की आता जे गृहस्थ आले त्यांचे? म्हणजे बरे झाले मी त्यांच्याशी काही बोलले नाही. नाही तर त्यांनी माझ्याविषयी काय विचार केला असता?

असे घडल्यावर मी गुगलगुरूचा आधार घेतला. ताबडतोब मी वाचलेल्या साहित्याचा उल्लेख करत, मला जो फोटो दिसला तो नवीन आलेल्या विकास सरपोतदार यांचा होता. हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आमच्या चर्चासत्रात ज्यांना बोलवले गेले होते त्या गृहस्थाने आपल्या जवळच्या मित्राला सांगितले की अरे तुझे पण नाव या पत्रिकेत आहे! ती पत्रिका पाहून या विवेक सरपोतदार यांनी पत्रिकेत दिलेल्या विषयाचा अभ्यास केला आणि कार्यक्रमाच्या दिवशी ते तिथे पोहोचले. कार्यक्रमाच्या आयोजकांनी, प्रायोजकांनी कोणीही त्यांना संपर्क केलेला नव्हता किंवा त्यांना कोणतेही पत्र किंवा पत्रिका पाठवलेली नव्हती! तसे ते स्वतःही लेखक होते पण सुप्रसिद्ध लेखक नव्हते. त्यांना अशा कार्यक्रमांचा फार अनुभवही नव्हता त्यामुळे त्यांना कोणी संपर्क केला नाही किंवा पत्रिका पाठवली नाही हेही लक्षात आलेले नव्हते!

त्यांना चुकीची माहिती देणाऱ्या या मित्राने आणि आजच्या कार्यक्रमाच्या चर्चकाने आयोजकांना खास विनंती केली, की आता दोन्ही विकास सरपोतदारांना बोलण्याची संधी द्यावी!

अशा तऱ्हेने कोणत्याही अचानकपणे आणि अनाहूतपणे आलेल्या माणसाला बोलण्याची संधी देता येणे, कोणत्याही प्रकारे या संस्थेला शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना याची पूर्ण कल्पना दिली गेली. या अनाहूत आलेल्या सरपोतदारांबरोबर त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आणि कौतुक पाहण्यासाठी त्यांची पत्नी, मुलगा-सून, नातेवाईक आणि काही मित्रही आलेले होते. शेवटी कार्यक्रम सुरू झाला आणि अनाहूतपणे आलेले विकास सरपोतदार आणि त्यांची जवळची माणसे प्रेक्षकात चुपचाप बसून होती. संपूर्ण कार्यक्रमभर मी बाजूला बसलेल्या सरपोतदारांपेक्षा समोर बसलेल्या सरपोतदारांचा विचार करत राहिले. कार्यक्रम संपल्यावर ज्या सरपोतदारांना मला सांगायचे होते, की त्यांचे साहित्य मी वाचलेले आहे, ते आवडलेले आहे वगैरे याविषयी मी त्यांच्याशी मनसोक्त बोलले, हे वेगळे सांगायची गरज नाही.

हा प्रसंग घडल्यानंतर दुसऱ्या दिवशीची गोष्ट. आमच्या एका मित्राने माझ्या कवितेच्या ओळी एका कार्यक्रमात सादर करण्यासाठी मागितल्या, तेव्हा मी त्यांना कार्यक्रमाविषयी उत्सुकतेने विचारले, तर ते म्हणाले की कवितेचा कार्यक्रम आहे आणि या गृहस्थाने कधी कवितेची एक ओळही लिहिलेली नव्हती. त्यांच्याच नावाचे एक प्रसिद्ध कवी मला माहीत होते. मी त्यांना अगदी ताजे घडलेले ‘विकास सरपोतदार’ प्रकरण सांगितले आणि त्यांनी ताबडतोब त्या आयोजकांना फोन करून सांगितले की ते कवी नाहीत, चुकून तर मला फोन केला नाही ना? आणि त्यांच्या लक्षात आले की याही आयोजकांना त्या सुप्रसिद्ध कवींना त्यांच्या कार्यक्रमात बोलवायचे होते! असेही घडू शकते...! हे आपल्या बाबतीत घडू नये यासाठी ‘नावात काय आहे...!’ हे पूर्णत्वाने लक्षात घ्या. इतकेच!

pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment