कथा; प्रा. देवबा पाटील
श्रावण महिना सुरू झालेला होता. त्यामुळे दर श्रावण सोमवारला शिवमंदिरावर चांगली मोठी जत्राही भरते हे त्यांना माहीत होतेच. जत्रा म्हटली की, तिथे आनंद द्विगुणित करणारी अनेक दुकाने असतातच. त्यामुळे कोणी काय काय घ्यायचे हेसुद्धा त्यांनी आताच ठरवून टाकले. प्रत्येक श्रावणी सोमवारला मुलांना सकाळी शाळा व दुपारी सुट्टी असायची.
योगायोगाने येणाऱ्या श्रावण सोमवारला १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आला. त्यादिवशी शाळेतील सर्व कार्यक्रम सकाळी लवकरच आटोपल्यानंतर दिवसभर सुट्टी
मिळणार होती.
“रविवारला आपण प्रत्येकाने आपापला सारा अभ्यास पुरा करून घेऊ आणि सोमवारला डबे घेऊन सहलीला जाऊ.”शिवमने असे म्हणताच साऱ्यांनी त्याच्या प्रस्तावाला होकार दिला. प्रत्येकाने संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपापल्या आई-वडिलांची अनुमती मिळविण्यासाठी त्यांची सहलीला जाण्याची योजना सांगितली.
सहलीला जाण्यासाठी प्रत्येकाला घरच्यांनी परवानगी दिल्याने साऱ्यांचा आनंद आभाळात मावत नव्हता. सगळी मुले सहलीच्या तयारीला लागली. सहलीला सकाळी केव्हा निघायचे, कशाने जायचे, त्यासाठी सोबत काय काय घ्यायचे, कसे परत यायचे याबद्दलचे नियोजन साऱ्यांनी अगोदरच्या तीन-चार दिवसांपासूनच जय्यत करून ठेवले. कारण त्यांना सहलीच्या आधीच्या दिवशी रविवारी आपापला शाळेचा अभ्यास पूर्ण करून घ्यायचा होता. प्रत्येकाने रविवारी अभ्यास पूर्ण करण्याचे आपापल्या आई-वडिलांना वचन दिले होते.
१५ ऑगस्टच्या सोमवारला सकाळी सारी मुले झोपेतून लवकर उठली. स्वच्छ गणवेष घालून शाळेत गेली. शाळेत सर्वप्रथम प्रभातफेरी निघाली. शिवम त्याच्या ‘शिवमसेना’ या बालवीर पथकाचा पथकनायक असल्याने हातात तिरंगी झेंडा घेऊन तो प्रभातफेरीमध्ये सर्वांच्या समोर होता. ‘जय हिंद-जय भारत’, ‘आपले गणराज्य-चिरायू होवो’, ‘जय भारत-जय हिंदुस्थान’ ‘भारतवासी-वीर महान। देशासाठी-देऊ प्राण।’अशा मोठमोठ्याने गर्जना देत सारी मुले-मुली रस्त्याने शिस्तीत चालत होती. त्यांच्या बाजूला ठरावीक अंतरांवर शिक्षक चालत होते. साऱ्यांच्या आनंदाला उधाण आलेले होते.
प्रभातफेरीनंतर शाळेत विविध राष्ट्रीय कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमांमध्ये ज्याने त्याने आपापल्या कलेनुसार, आवडीप्रमाणे भाग घेतला. शिवमने राष्ट्रीय एकात्मता या विषयावर भाषणात भाग घेतला. त्याचे भाषण खूप प्रभावी झाल्याने प्रमुख पाहुण्यांनी त्याचे कौतुक केले. त्यानंतर त्याने एक वीरश्रीयुक्त पोवाडा म्हटला. मुलांना, तर आज शाळेतील कार्यक्रम केव्हा संपताेय अन् केव्हा नाही असे झाले होते. शेवटी एकदा शाळेतील समारंभ संपला. वर्गप्रमुख या नात्याने शिवमने त्याच्या वर्गातील सर्व मुलांना प्रसाद वाटला. एका मुलीने मुलींना प्रसाद वाटला. त्यानंतर सर्वजण लगबगीने घरी परतले. प्रत्येकाने आपापल्या घरी जाण्याबरोबर आईने दिलेला नाश्ता घाईघाईनेच उरकला. बॅगमध्ये डबे घेतले नि आधी ठरल्याप्रमाणे वेदपूरला जाणारी बस हुकू नये म्हणून धावपळ करीत ताबडतोब सारे बसस्टँडवर जमा झाले. थोड्याच वेळात ती बस आली. श्रावण सोमवार असल्याने बस शंभू भोलेनाथाच्या भक्तांच्या गर्दीने खचाखच भरलेली होती. पाय ठेवायलाही बसमध्ये जागा नव्हती. कंडक्टर नेहमीप्रमाणे ‘जागा नाही, जागा नाही. प्रवाशांना उतरू द्या. कुणीच बसमध्ये चढू नका.’ असे म्हणत असतानाही बसमधील प्रवासी खाली उतरल्यानंतर इतर गावकऱ्यांसोबत कशीतरी शिवमसेना बसमध्ये घुसली व बसच्या गर्दीत दाटीवाटीने उभी राहली.
बसमध्ये सगळे प्रवासी भोलेनाथ महादेवाचे वारकरी भक्त असल्याने ‘हर हर महादेव’च्या गर्जनेनेे बस सुरू झाली. अधूनमधून कोणी ‘जय शिवशंकर’ कुणी ‘बम बम भोले’ तर कोणी ‘जय भोलेनाथ’चा गजर करीत होते. या गर्जनांनी बस दुमदुमून गेली. काही स्त्रिया शिवस्तोत्र वाचत होत्या. तर काही ‘ॐ नम: शिवाय’ मंत्राचा जप करीत होत्या. हे गजर ऐकून शिवमसेनेला एक वेगळाच आनंद येत होता. तेसुद्धा उत्स्फूर्तपणे त्या गर्जनांमध्ये सामील झाले व गर्दीचा त्रास विसरून गेले.