मंत्री छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य; शक्य तिथे ‘पीएनजी’ गॅस जोडणी करून घेण्याचे आवाहन
मुंबई : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावर निर्माण झालेला इंधनाचा तुटवडा पाहता, आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरचा (एलपीजी) पुरवठा मर्यादित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, "ज्या ठिकाणी पाईप गॅस (पीएनजी) उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी तातडीने जोडण्या करून घ्याव्यात, अन्यथा पुढच्या तीन महिन्यांत तुमचा सिलिंडर बंद होऊ शकतो," असे सूचक वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केले.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे शनिवारी गॅस पुरवठ्याबाबत केंद्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय नगरविकास आणि गृह निर्माण मंत्री मनोहर लाल खट्टर, तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह सर्व राज्यांतील नागरी पुरवठा मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून, केंद्र सरकारने आता पीएनजीच्या प्रसारावर भर देण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
इमारतींना ज्याप्रमाणे पाणी आणि विजेची जोडणी असल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) दिले जात नाही, त्याच धर्तीवर आता पीएनजी जोडणीची अट अनिवार्य करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनी पीएनजी जोडण्यांना प्राधान्य द्यावे. राज्यात पीएनजी नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी सरकारने नियमावली शिथिल केली आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी विविध विभागांकडून लागणाऱ्या परवानग्या आता शिथिल झाल्या आहेत. पीएनजीसाठीची परवानगी २४ तासांत दिली जाईल आणि ते काम करणाऱ्या कंपन्यांना दिवसाचे २४ तास काम करण्याची मुभा असेल. महापालिका, सार्वजनिक बांधकाम किंवा पोलीस विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी काम थांबणार नाही, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. दि. ३० जून २०२६ पर्यंत हे विशेष आदेश लागू राहतील.
राज्यात साडेतीन हजार लिटर केरोसीन उपलब्ध
भुजबळ म्हणाले, पीएनजीबाबत पायाभूत सुविधांसाठी केंद्राने राज्याला तांत्रिक आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मी बैठकीत केली. राज्यात साडेतीन हजार लिटर केरोसीन उपलब्ध आहे. जिथे एलपीजी किंवा पीएनजीची कमतरता आहे, तिथे केरोसीन वापरण्यास परवानगी दिली आहे. पेट्रोल पंपांवर केरोसीन टँकर उपलब्ध करून दिले जातील. पीएनजी विस्तारासाठी समन्वय साधण्याकरता शिधावाटप संचालकांना 'नोडल ऑफिसर' म्हणून नियुक्त केले आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.






