मुंबई : राज्यात हवामानाने अचानक कोंडी केली असून एका बाजूला मुंबई (Mumbai) मध्ये उकाड्याने अक्षरशः घामाच्या धारा सुरू आहेत, तर दुसरीकडे विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. इस्लामाबादकडून सरकणाऱ्या वाऱ्यांमुळे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून त्याचा परिणाम महाराष्ट्रासह कर्नाटकावर होत आहे. तसेच बंगालच्या उपसागराकडूनही हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे, तर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे.
यामुळे पुढील काही दिवस राज्यात मिश्र हवामान पाहायला मिळणार आहे. पुढील २४ तासांत किमान तापमानात सुमारे ४ अंशांनी घट, तर कमाल तापमानात ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर दोन दिवस तापमानात चढ-उतार सुरूच राहतील.
आज विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. २९ मार्च रोजी कोकण वगळता राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
३०,३१ मार्च आणि १ एप्रिलदरम्यान राज्यभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून IMD ने अलर्ट जारी केला आहे.






