Saturday, March 28, 2026

नालेसफाईच्या कामाला गती, मिठी नदीच्या सफाईला रविवारपासून होणार सुरुवात

नालेसफाईच्या कामाला गती, मिठी नदीच्या सफाईला रविवारपासून होणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ उपशाची कामे गतीने करण्यात येत आहेत. मिठी नदीतून गाळ काढण्याची कामे रविवारपासून सुरु होतील. ठराविक मुदतीत ही कामे पूर्ण होतील, त्यादृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्‍या उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांनी प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी भेट द्यावी. नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष व अन्य लोकप्रतिनिधींना नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाची नियमित माहिती द्यावी. त्यांच्या समवेत पाहणी दौरे आयोजित करावेत,असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या कामांचा प्रशासकीय विभाग (वॉर्ड) आणि परिमंडळनिहाय शनिवारी २८ मार्च २०२६ रोजी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या विभाग) कल्पना राऊळ यांच्यासह सर्व परिमंडळ सहआयुक्त/ उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

मुंबईतील मोठ्या व लहान नाल्‍यांतील गाळ काढण्याच्या सुयोग्य नियोजन करावे. नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निश्चित स्थळावर विल्हेवाट लावावी. रेल्वे प्रशासन व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याशी प्रभावी समन्वय साधावा. पावसाळ्यात नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत व अखंड राहील, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणी देखील बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामेही समाविष्ट आहेत. रेल्वे प्रशासनासमवेत समन्‍वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, मुंबईत पाणी साचू नये, त्‍याचा जलद गतीने निचरा व्‍हावा यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखाव्‍यात, असे निर्देश आयुक्‍त गगराणी यांनी दिले

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, पावसाळा सुरू व्हायला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्‍लक आहे. ठरवून दिलेल्‍या वेळापत्रकानुसार गाळ उपशाचे कामकाज सुरू आहे. उर्वरित कालावधीत गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करावीत. मोठ्या नाल्यातून गाळ काढण्याचे कामकाज केव्हा सुरु केले, केव्हा संपणार याचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी . गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जाणार आहे. त्याद्वारे नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे.

Comments
Add Comment