मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेकडून सन २०२५ मध्ये तब्बल ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले आहे. तर १ हजार ४६० झाडांवरील जाहिरात फलक तसेच झाडांवरील तब्बल १७.४३ किलो खिळे काढण्यात आल्याचा दावा महापालिका उद्यान विभागाने केला आहे. मात्र,वृक्षांना आवश्यक पाणी व प्राणवायू मिळून सुदृढ वाढ होण्यास मदत होण्यासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
मुंबईत सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी आहेत. या वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या अभियान अंतर्गत वृक्षांभोवती साचलेले सिमेंट- काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे अशा उपाययोजना केल्या जातात. झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्यांचे संरक्षण करण्याचे कामही यामध्ये समाविष्ट आहे.
तज्ज्ञांच्या मते, वृक्षांच्या मुळांभोवती काँक्रिट असल्यास पाणी जमिनीत मुरत नाही, परिणामी मुळांची वाढ खुंटते आणि झाडे कोमेजण्याचा धोका वाढतो. तसेच खिळे, वायर व जाहिरात फलकांमुळे झाडांच्या खोडाला इजा होऊन भविष्यात झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण होते. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष जतन व संवर्धन अधिनियम, १९७५ अंतर्गत जनजागृती करणे, हे वृक्ष प्राधिकरणाचे कर्तव्य असल्याने या अभियानाला विशेष महत्त्व आहे. या अभियानात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेतला जाणार आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारीही यामध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, उपलब्ध संसाधनांचा वापर करुन ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.






