मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी (२९ मार्च) मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल गाड्यांचे मार्ग बदलले जाणार असून काही सेवा रद्दही करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे: मुख्य मार्गावर बदल
माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ या वेळेत ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबतील आणि पुढे पुन्हा धीम्या मार्गावर आणल्या जातील.
ठाण्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या धीम्या लोकलही मुलुंड येथे जलद मार्गावर वळवून माटुंगा येथे पुन्हा मूळ मार्गावर आणल्या जातील. त्यामुळे प्रवाशांनी वेळ आणि प्लॅटफॉर्मची माहिती तपासूनच प्रवास करावा.
ट्रान्स हार्बर मार्गावर मोठा परिणाम
ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. या दरम्यान ठाणे ते वाशी, नेरुळ आणि पनवेल दरम्यान धावणाऱ्या अनेक लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. दोन्ही दिशेतील प्रवाशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेवर रात्रभर काम
कांदिवली ते बोरिवली दरम्यान पायाभूत कामांसाठी मोठा ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवारी रात्री १०:३० पासून रविवारी सायंकाळी ७:३० पर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक असेल, तर जलद मार्गावर मध्यरात्री १ ते पहाटे ४:३० दरम्यान ब्लॉक राहील.
या काळात धीम्या मार्गावरील सर्व लोकल गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील. काही स्थानकांवर थांबे रद्द करण्यात आले असून राम मंदिर, मालाड आणि कांदिवली येथे काही लोकल थांबणार नाहीत. तसेच बोरिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ पूर्णपणे बंद राहतील. काही गाड्या रद्दही करण्यात येणार आहेत.
मेगाब्लॉकदरम्यान लोकलच्या वेळा आणि मार्गात बदल होणार असल्याने प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासणे अत्यावश्यक आहे. शक्य असल्यास पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा किंवा प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवावे. असे आवाहन केले जात आहे.






