- अफवा पसरवणाऱ्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल
युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन आणि गॅसचा तुटवडा आहे, म्हणून आता राज्यात कोविड काळाप्रमाणे लॉकडाऊन लागेल अशा अफवा सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी इशारा देताना म्हटले की, लॉकडाऊन किंवा इंधन तुटवड्याबाबत खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अगदी फेक व्हॉट्सॲप मेसेज फॉरवर्ड करणे देखील गुन्हा ठरू शकतो, त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशात इंधनाचा पुरेसा साठा :
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीत अनेक देशांमध्ये ‘शटडाऊन’सारखी परिस्थिती असली, तरी भारतात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. देशाकडे किमान एक महिना पुरेल इतका इंधनसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारचाही पुनरुच्चार :
याच मुद्द्यावर हरदीप सिंह पुरी यांनीही नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारचा लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, संकटाच्या काळात संयम बाळगणे गरजेचे असून अफवा पसरवणे देशासाठी घातक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
इंधन दरांबाबत दिलासा :
दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. पेट्रोलवरील शुल्क ₹१३ वरून ₹३ पर्यंत कमी करण्यात आले असून, डिझेलवरील ₹१० प्रति लिटर उत्पादन शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. यामुळे वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भार सर्वसामान्यांवर पडणार नाही, अशी माहिती देण्यात आली.
एकूणच, सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की देशात इंधन तुटवडा किंवा लॉकडाऊनची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांपासून सावध राहून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.






