मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर अप्सरा म्हणून राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता हटके आणि नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी संर्पूण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या सालबर्डी या सिनेमातील मंजुळा या धमाकेदार आयटम साँगमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हटके आणि मनमोहक अंदाजात झळकणार आहे.
'मंजुळा' या आयटम साँगची कोरिओग्राफी तितकीच आकर्षक असून, या गाण्याची कोरिओग्राफी फुलवा खामकरने केली आहे. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत असलेल्या या गाण्याची गायिका आनंदी जोशी आहे.
महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या 'सालबर्डी' या गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा 'सालबर्डी' सिनेमा नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे.
या सिनेमात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी हे कलाकार झळकणार आहेत.
'सालबर्डी' या सिनेमाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






