मुंबई : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यावर्षी भारत आणि श्रीलंका येथे टी20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड असा सामना रंगला होता. ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका प्रशिक्षकासह एका माजी क्रिकेटपटूला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी २६ वर्षीय बलवंत सिंह सोधा याला अटक केली असून तो यापूर्वी मुंबई अंडर-१९ संघाकडून खेळला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, या नेटवर्कमध्ये बलवंत सिंहची महत्त्वाची भूमिका होती आणि तिकिटांची व्यवस्था तोच करत होता. त्यानंतर तो आपल्या साथीदारांना ही तिकिटे जास्त दराने विकण्यासाठी पुरवत होता.
रिपोर्टनुसार, उपांत्य सामन्याची तिकिटे २५ ते ३५ हजार रुपयांना विकली गेली. आतापर्यंत या प्रकरणात एकूण ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये एका महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकासह एका नॉन-टीचिंग स्टाफ सदस्याचाही समावेश आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित व्यक्तींना किंवा पाहुण्यांना दिले जाणारे पास आरोपींनी मिळवून त्यांची विक्री सुरू केली असावी. काही तिकिटे थेट लोकांना तर काही ऑनलाइन माध्यमातून विकण्यात आली.






