उन्हाळ्याचा तडाखा सध्या सर्वत्र जाणवत आहे. अनेकजण उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी आणि घशाची कोरड घालवण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा यांसारखे पेय पिणं पसंत करतात. मात्र फार कमी लोकांना हे माहित आहे की उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी 'गुलकंद' हा फार उत्तम पर्याय आहे. 'गुलकंद' पचनक्रिया सुधारण्यापासून त्वचा निरोगी ठेवण्यापर्यंत आपल्यासाठी अंत्यत फायदेशीर ठरतं.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार करण्यात येणार 'गुलकंद' खाण्यासाठी चविष्ठ असण्याबरोबरच आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठीही उत्तम मानला जातो. चला तर जाणून घेऊयात 'गुलकंद'चे फायदे.
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर किंवा गूळ एकत्र करून 'गुलकंद' तयार केला जातो. उन्हाळ्यात थंडावा देणारा नैसर्गिक पदार्थ म्हणून 'गुलकंद' घराघरात वापरला जातो.
'गुलकंद'चं सेवन करणं फायदेशीर असून तुम्ही थेट चमचाभर गुलकंद खाऊ शकता. तसेच दूध किंवा दह्यासोबत मिक्स करूनही गुलकंदाचं सेवन केलं जातं.
हे आहेत 'गुलकंद' खाण्याचे फायदे
गुलकंदात गुलाबाच्या पाकळ्यांचे नैसर्गिक गुणधर्म असल्यानं हे शरीराला थंडावा देण्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
उन्हाळ्यात बऱ्याचदा पोटाच्या समस्या उद्भवतात, अशा वेळी दररोज थोड्या प्रमाणात गुलकंदाचं सेवन केल्यानं पचन सुधारतं आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.
गुलकंदात अँटी-ऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असल्यानं हे शरीराची रोगप्रतिकार प्रणाली मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं.
उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या सामान्य असून त्वचा लवकर निस्तेज दिसू लागते. यावेळी त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी गुलकंद अत्यंत फायदेशीर ठरतो.
उन्हाळ्यात गुलकंदाचं सेवन केल्यानं शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात तुम्ही गुलकंदाचा सरबत तयार करू शकता किंवा आईस्क्रीममध्येही मिक्स करून गुलकंदांचं सेवन करू शकता. उन्हाळ्यात गुलकंद घातलेलं थंड दूध किंवा सरबत पिणं अनेकजण पसंत करतात.






