मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारपट्टी मार्गावर म्हणजेच कोस्टल रोडवर वाजवण्यात येणाऱ्या ‘जय हो’ गाण्याच्या धूनमुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.
याचीच दखल घेत महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार आता जय हो ची धून दररोज रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून (२६ मार्च) सुरू करण्यात आली आहे.
कोस्टल रोडवरून दररोज सरासरी सुमारे ६० हजार वाहने प्रवास करतात. मात्र, रात्रीच्या शांततेत ‘जय हो’ची धून वाजवल्यामुळे ध्वनिप्रदूषण वाढत असल्याची आणि झोपेचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.
पालिकेने या तक्रारींची गंभीर दखल घेत परिसरातील काही घरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. त्यानंतर हा तोडगा काढण्यात आला. या निर्णयामुळे स्थानिकांना दिलासा मिळेल आणि ध्वनिप्रदूषणातही घट होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
त्यामुळे आता रात्रीच्या वेळी कोस्टल रोडवरील ‘जय हो’ला ब्रेक लागला आहे.






