Friday, March 27, 2026

अशोक खरात प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

अशोक खरात प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्कार, महिलांशी गैरवर्तन, महिलांची फसवणूक अशा गंभीर आरोपांत अटक झाली आहे. या प्रकरणात विशेष तपास पथक तपास करत आहे. याच अशोक खरातची पाद्मपूजा करताना आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरताना तसेच अनेक कार्यक्रमात खरात सोबत वावरताना रुपाली चाकणकरांचे फोटो समोर आले. एका ट्रस्टमध्ये खरात आणि रुपाली चाकणकर हे दोघेही ट्रस्टी असल्याची माहिती समोर आली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागल्यामुळे त्यांना अशोक खरात प्रकरण भोवल्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजीनाम्याबाबत रुपाली चाकणकर यांनी एक्स पोस्ट करून माहिती दिली आहे.

'खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे'; अशी एक्स पोस्ट रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Comments
Add Comment