मुंबई : बिग बॉस फेम लोकप्रिय मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकर तिच्या व्लॉग्समुळे कायम चर्चेत असते. इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंकिता फॅशन, ट्रॅव्हल, डेली लाइफ आणि त्यासंबधित कंटेंट सतत शेअर करत असते.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात झळकलेल्या अंकिता वालावलकरनं नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करुन तिचं ड्रीम होम घेतल्याची गूड न्यूज शेअर केली होती. अशातच आता अंकिता वालावलकरनं आणखी एक गूड न्यूज चाहत्यांसोबत आपल्या इनस्टाग्राम पोस्टवरून शेअर केली आहे.
अंकितानं बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानसोबतच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. अंकिताची पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं आमिर खानची भेट नेमकी का घेतली? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, अनेकांनी तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव केला आहे.
या पोस्टमध्ये 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरनं आमिरसोबतचे फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, "आमिर खान यांच्या विचारांमध्ये असलेली स्पष्टता आणि समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याची त्यांची जिद्द मनाला खूप भावली. आता त्यांच्या Paani Foundation @pani_foundation_india सोबत मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी मला मिळत आहे, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आणि अभिमानाची बाब आहे. कोकण हा निसर्गानं नटलेला प्रदेश असला तरी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची गरज इथेही तितकीच महत्त्वाची आहे. अशा वेळी पाणी फाउंडेशनसारख्या उपक्रमाचं कोकणात प्रथमच आगमन होणं, ही अत्यंत आनंदाची आणि सकारात्मक सुरुवात आहे."
"या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना सक्षम बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कोकणातून सुरू झालेली ही वाटचाल महाराष्ट्रभर नवी ऊर्जा आणि आशा निर्माण करेल, असा मला विश्वास आहे...", असं 'कोकण हार्टेड गर्ल' अंकितानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
View this post on Instagram
अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये पाणी फाउंडेशनची स्थापना केली. या उपक्रमामुळे अनेक दुष्काळग्रस्त गावांनी स्वतःच्या प्रयत्नातून पाण्याची समस्या कमी केली असून यामुळे अनेक ग्रामीण भागात पाण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.
पाणी फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करते. सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि श्रमदानाची चळवळ उभी करण्यात आली आहे. आता 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता या संस्थेत सहभागी झाल्यानं चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.






