Wednesday, March 25, 2026

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत सरकारने विरोधी पक्षांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना देशात पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट केले. तसेच स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील परिस्थितीबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली.

बैठकीत सरकारने सांगितले की, देशात सध्या पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कोणतीही कमतरता नाही, पुरवठाही पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. काही ठिकाणी कमतरतेच्या बातम्या येत असल्या तरी त्याचे मुख्य कारण सप्लाय चेनमधील अडचणी आहेत. बैठकीत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ येथील परिस्थितीबाबत चर्चा झाली. अनेक देशांची जहाजे अजूनही त्या भागात अडकलेली आहेत, मात्र भारताची जहाजे सुरक्षित बाहेर येत आहेत. या घटनेला भारताच्या राजनैतिक आणि धोरणात्मक यश म्हणून पाहिले जात आहे.

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीतील चर्चेविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, या बैठकीला सर्वांनी उपस्थिती लावली आणि सक्रिय सहभाग नोंदवला. सर्व पक्षांच्या नेत्यांनी माहितीची देवाणघेवाण केली आणि आपापल्या पक्षांच्या वतीने आपल्या चिंता व्यक्त केल्या. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियात निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतावर कसा परिणाम होईल आणि भारतीय जनतेसाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, याविषयी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अनेक प्रश्न विचारले. सरकारने या सर्व प्रश्नांना अत्यंत सविस्तर आणि सखोल उत्तरे दिली.

रिजिजू पुढे म्हणाले, सरकारच्या वतीने विरोधी पक्षांच्या ज्या काही शंका होत्या किंवा जो काही संभ्रम होता, त्या सर्वांचे सरकारने अत्यंत स्पष्टपणे निरसन केले. बैठकीच्या शेवटी विरोधी पक्षांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नमूद केली; ती म्हणजे, ही सर्वपक्षीय बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. त्यांनी हे देखील ठामपणे सांगितले की, अशा कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे.

Comments
Add Comment