मुंबई - हिंदी सिनेमा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथे असलेल्या 'शेट्टी टॉवर' घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी फरार आरोपी प्रदीप शर्मा उर्फ गोलू याला अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राइम ब्रँचनं ही कारवाई केली असून या तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गोळीबार करणाऱ्या दीपक याला हा गुन्हा करण्यासाठी ३ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात शस्त्रे पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अर्जू बिश्नोईचं नावही समोर आलं आहे. अर्जू बिश्नोई हा बॅक-एंड सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स हाताळत होता. या प्रकरणी तपास सुरू आहे. मुंबई क्राइम ब्रँचने विविध कलमांखाली रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणाबाबत गुन्हा नोंदवला आहे.
शूटर दीपक आणि त्याचा साथीदार गोलू हे एकाच भागातील असून गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांचे मित्र आहेत. दीपकचे कुटुंब शेतकरी आणि मजूर म्हणून काम करतं, तर दीपक आणि गोलू यांच्याकडे रोजगार नव्हता. गोलूने दीपकला मोठ्या रकमेचे आमिष दाखवून गुन्हेगारीच्या जगात ओढलं.
रोहित शेट्टी प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी, आरोपींनी सिग्नल ॲपद्वारे एकमेकांशी संवाद साधला. पोलीस पथकानं आठ दिवस तपास केल्यानंतर या तपासात सुमारे १६०० संशयास्पद मोबाईल क्रमांकांच्या डेटाची तपासणी केली. त्यानंतर मोबाईल टॉवरची ठिकाणं आणि नुकतेच सक्रिय केलेले क्रमांक अशा पद्धतीने तपासत अखेर आरोपींना शोधले आणि पकडले.
अटकेनंतर, दीपकने दावा केला की गोलूने त्याला शस्त्र दिले होते, तर गोलूने दावा केला की दीपक ते शस्त्र स्वतःसोबत घेऊन आला होता. शस्त्राचा खरा पुरवठादार कोण आहे, हे निश्चित करण्यासाठी पोलीस आणखीन तपास करत आहेत.
पोलीस तपासात असेही उघड झाले की, २०२५ मध्ये राजस्थानमधील एका गोळीबाराच्या घटनेत गुन्हेगार गोलू सामील होता. यानंतर पोलिसांनी तांत्रिक पाळत ठेवून गोलू पंडितला आग्रा येथे शोधून काढलं. पोलीस डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची जुळवाजुळव करत असून या प्रकरणाबाबत आणखीन तपास सुरु आहे.






