विनय जोशी, आयसीआरआर - संघर्ष संशोधन आणि निराकरण संस्था
इराणवर अमेरिकन, इस्रायली हल्ले सुरू होऊन आता महिना होत आला. पहिल्या ७२ तासात इराणी शिया राजवट सत्तेवरून खाली येईल आणि आपली गुलाम राजवट इराणवर येऊन आपण हा विषय मार्गी लावून मग क्युबाचा घास घ्यायला मोकळे होऊ ही ट्रम्पची योजना काही पूर्ण होताना दिसत नाही.
इराणी सैन्याने पहिल्या काही दिवसात होर्मुझ स्ट्रेट बंद केल्याने जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. आता इराण सध्या काही देशांची जहाजे आणि तेल टँकर्स प्रत्येकी २ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे १८ कोटी रुपये घेऊन काही देशांची जहाजे होर्मुझ स्ट्रेट मधून जाऊ देत आहे त्यात भारतीय जहाजे सुद्धा आहेत. होर्मुझच्या आत आणि बाहेर सुमारे साडे तीन हजार जहाजे, टँकर्स अडकून पडले आहेत. आजपर्यंत इराणी सैन्याला न जुमानता बाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या २० जहाजांवर इराणी सैन्याने मिसाईल किंवा ड्रोन डागून ती जाळल्याने कुणीही या धाडसात उतरायला तयार नाही.
सामान्य माणसाच्या आयुष्यावर याचे परिणाम काय?
जागतिक तेल पुरवठ्याच्या विस्कळीत होण्याने फक्त पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होईल अशी सगळ्यांची धारणा असते. परंतु आधुनिक जगात क्रूड तेलापासून निर्माण होणाऱ्या पदार्थांनी आणि वस्तूंनी इतक्या प्रमाणात घुसखोरी केलेली आहे की क्रूड पुरवठा बंद म्हणजे सामान्य माणसाचं आयुष्य ठप्प अशी स्थिती आहे. काल भारतीय संसदेत पंतप्रधान मोदी यांनी याची लॉकडाऊन सोबत केलेली तुलना ही ह्या टोकाच्या क्रूड अवलंबनामुळेच आहे.
याचे दूरगामी परिणाम लक्षात ठेवले आणि आपल्याला नेमक्या काय अडचणी येऊ शकतात हे बघितलं तर येणारे काही महिने आपण काळजी घेऊ शकतो.
१. गॅस तुटवडा : कतरच्या रास लफ्फान गॅस टर्मिनल वर झालेल्या इराणी हल्ल्यात मोठ्या नुकसानामुळे भारताच्या ४७% गॅस पुरवठ्यावर थेट परिणाम झाला आहे. यामुळे गॅसवर आधारित सगळे उद्योग अडचणीत आहेत. कोळशाला पर्याय म्हणून, प्रदूषण विरहित आणि वापरायला सोपा म्हणून एलपीजी गॅस कित्येक उद्योगात एकमेव इंधन स्रोत म्हणून वापरला जातो. याच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने होणारी अडचण आता समोर येऊ लागली आहे.
** रेस्टॉरंट आणि तयार अन्न उद्योगाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. याचा थेट परिणाम येणाऱ्या काळात फूड होम डिलिव्हरी उद्योगावर होईल. यात लक्षावधी लोक डिलिव्हरी चेनमध्ये राहून रोजगार कमावतात ते याने बेरोजगार होतील.
** जगातील क्रमांक २ चे सिरॅमिक उत्पादन हब गुजरातच्या मोर्बी मध्ये विकसित झालेलं आहे. इथे देशातील ९०% टाईल्स उत्पादन होतं आणि यात ९ लाखाच्या आसपास माणसे काम करतात.इथे वार्षिक ५०,००० कोटींची उलाढाल होते पैकी १८,००० कोटींची निर्यात होते. युद्ध सुरू झाल्यापासून इथल्या ५०० कारखान्यांनी काम बंद केलं आहे कारण सध्या फक्त घरगुती गॅस पुरवठा ही सरकारची प्राथमिकता आहे. याचा परिणाम काही काळानंतर रिअल इस्टेट मधील रोजगारावर होईल कारण घर, फ्लॅट बांधून झाला तरी अंतर्गत कामे टाईल्स नसल्याने खोळंबतील.
** काचेच्या बाटल्या आणि गृहोपयोगी वस्तूंच्या भट्ट्या मोठ्या प्रमाणात गॅस वापरतात. या भट्ट्या बंद करून परत चालू करण्यात मोठा वेळ जातो आणि परत सुरू करताना नुकसान होऊ शकतं. बाटल्यांचा पुरवठा खंडित किंवा विस्कळीत झाला की दारू, औषधे पॅकिंग साठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या महाग होणार किंवा अपुऱ्या पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण होणार. याला पर्याय म्हणून प्लास्टिक बाटल्यांचा पर्याय बघावा तर तो ही पेट्रोलियम पदार्थांपासून बनतो त्यामुळे त्यातही अडचण आहेच.
२. पेट्रोकेमिकलवर आधारित औषध उद्योग : कित्येक आधुनिक औषधे पेट्रोकमिकल पासून बनतात. त्यामुळे त्याच्या अपुऱ्या पुरवठ्याचा परिणाम औषध उत्पादनावर होणं स्वाभाविक आहे. अनेक औषधात जवळपास सगळे इंग्रेडिएंट पेट्रोकेमिकल मधून येतात.
** आपण रोजच्या आयुष्यात सगळ्यात जास्त वापरतो ते औषध म्हणजे पॅरासिटामॉल ते फिनॉलपासून तयार होतं. आयबुप्रोफेन हे वेदनाशामक आयसोब्युटिल्बेन्झिन आणि प्रोपियोनिक ॲसिडपासून तयार होतं. डायबेटिक पेशंट रक्तातील साखर कमी करण्यासाठी वापरतात ते मेटफॉर्मिन ८० ते ९०% पेट्रोकेमिकल आधारित असतं. याशिवाय अन्य औषधांसाठी लागणारा ९९ टक्के कच्चा माल पेट्रोकेमिकलपासून येतो. प्लास्टिक बनवणारे 'क्रॅकर्स' बंद झाले की औषधांचा कच्चा मालही उपलब्ध व्हायचा बंद होतो.
** होर्मुझ स्ट्रेट मधून औषध निर्मितीसाठी लागणारा 'नॅफ्था' जगभरात पोचतो, ती सध्या बंद आहे. नॅफ्था हा औषध उद्योगात सॉल्व्हेंट म्हणून वापरतात आणि ऍक्टिव्ह इंग्रेडियंट वेगळा करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. भारत हा जगातील जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. जगाच्या २० टक्के आणि अमेरिकेच्या ४० टक्के गरजा भारत पूर्ण करतो. पण सध्या पुरवठ्यातील व्यत्ययामुळे हा उद्योग संकटात आहे. कमी पुरवठ्यामुळे सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिल्याने उद्योगांना मिळणाऱ्या पेट्रोकेमिकल उत्पादनांची टंचाई निर्माण झाली आहे.
** भारतातील 'सीरम इन्स्टिट्यूट' सारख्या संस्था जगाला ४०-५०% लसी पुरवते, त्याही याच पेट्रोकेमिकल पदार्थांवर अवलंबून आहेत. लसीच्या बाटल्या, सिरिंज, पॅकेजिंग मधील अत्यंत उच्च दर्जाचं विशेष ग्रेडचं प्लास्टिक आणि लसीमधील घटकही पेट्रोकेमिकलवर आधारित आहेत. त्यामुळे याच्या उत्पादन खर्चात वाढ आणि उपलब्धतेत घट होऊ घातली आहे.
३. खते आणि कृषी उत्पादन : जागतिक रासायनिक खतांच्या उत्पादनात अरब देश आणि इराणचा वाटा २०% आहे पण युरिया उत्पादनात हा वाटा ४६% आहे. भारत, ब्राझील, चीन हे अरब देशांचे मोठे ग्राहक आहेत. भारत आपल्या वार्षिक गरजेच्या ५०% युरिया अरब देशातून घेतो. शिवाय अमोनियम नायट्रेट सारखी अन्य खते अरब देशातून येतात. आज रशियाने खतांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केल्याने भारतासाठी आगामी काळात वाढलेल्या दराने खते विकत घ्यावी लागतील. शिवाय कमी खतांमुळे देशातील अन्न उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. खतांच्या वाढलेल्या दरांमुळे आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे जगभरात अन्नाच्या टंचाईची शक्यता आत्ताच बोलून दाखवली जात आहे. अन्न टंचाई आणि राजकीय स्थिरता याचा जवळचा संबंध आहे. ज्या ज्या देशात अन्न टंचाई निर्माण होते आणि महागाई वाढते त्या त्या देशात सत्ताधारी पक्षांना आंदोलने आणि हिंसाचाराचा सामना करावा लागतो असा इतिहास आहे यामुळे आशिया, आफ्रिका आणि लॅटीन अमेरिकेत याने बरीच राजकीय वादळे येऊ घातली आहेत.
४. सल्फर टंचाई : अरब देशांचा सल्फर उत्पादनात ५०% जागतिक वाटा आहे. जवळपास सर्व रिफायनरी इराणी हल्ल्यांनी प्रभावित झालेल्या आहेत किंवा होर्मुझ स्ट्रेट बंद असल्याने तयार उत्पादन जागतिक बाजारात जायला रस्ता उपलब्ध नाही. याचा परिणाम सल्फर आधारित खतांच्या पुरवठ्यावर झाला आहे, शिवाय याचे दर ५०% नी वाढले आहेत. सेमीकंडक्टर उद्योगात अत्यंत शुद्ध सल्फ्युरिक ऍसिड सिलिकॉन वेफर्सच्या उत्पादन प्रक्रियेत वापरलं जातं. त्याच्या टंचाईने ही प्रक्रिया धीमी पडत आहे. शिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी उद्योगात कॉपर, निकेल, कोबाल्ट उत्पादनात सल्फ्युरिक ऍसिड अत्यावश्यक असल्याने सर्व ईव्ही उत्पादक कंपन्या सध्या चिंतेत आहेत. याचा परिणाम सरसकट सगळ्या बॅटरी उद्योगावर होणार आहे.
५. हेलियम शॉक आणि डिजिटल उद्योग : नैसर्गिक वायू प्रक्रियेदरम्यान उप-उत्पादन म्हणून हेलियम काढला जातो. जेव्हा एलएनजी उत्पादन थांबते, तेव्हा हेलियमचा पुरवठा बंद होतो. कतारमधील रास लाफान कॉम्प्लेक्सवर झालेल्या हल्ल्यांनंतर हेलियम उत्पादन ठप्पा आहे. इथे जगातील सर्वात जास्त हेलियम उत्पादन होतं.जागतिक पुरवठ्यापैकी सुमारे ३० ते ३६ टक्के भाग इथून पुरवला जातो. रास लफ्फान उत्पादन क्षमता कमी होणे अधिक लॉजिस्टिकच्या अडचणींमुळे हे संकट अधिक गंभीर झालं आहे. हॉर्मुझची स्ट्रेट पाश्चात्य जहाजांसाठी बंद झाल्यामुळे, हेलियमचे कंटेनर्स आखाती देशांत अडकून पडले आहेत. द्रव हेलियम क्रायोजेनिक स्टोरेजमध्ये असूनही सतत बाष्पीभूत होत असतो. जर हे कंटेनर अंदाजे ४५ दिवसांच्या आत हलवले गेले नाहीत, तर गॅस टँकर्स मधील मोठा भाग कायमचा नष्ट होतो. याचा परिणाम बाजारात आधीच दिसत असून, अति-शुद्ध हेलियमच्या किमती दोन आठवड्यांत दुप्पट झाल्या आहेत.
** वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत महत्वाची एमआरआय स्कॅनिंग मशिन्स मधून निर्माण होणाऱ्या इमेज मध्ये स्पष्टता येण्यासाठी त्या मशीनमध्ये मॅग्नेट सतत गार रहावी लागतात. त्यासाठी अत्यंत कमी तापमान राहणं अतिशय आवश्यक असतं, ही फक्त हेलियम मुळे साध्य होतं. त्यामुळे हेलियम तुटवड्याचा यावर लगेच परिणाम होणार आहे.
** तात्काळ आणि गंभीर परिणाम पूर्व आशियातील सेमीकंडक्टर उद्योगावर होत आहे. सेमीकंडक्टर बनवण्याच्या प्रक्रियेत हेलियम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. सेमीकंडक्टर मधील वेफर्स थंड करण्यासाठी याचा वापर होतो. शिवाय व्हॅक्यूम सिस्टममध्ये गळती तपासण्यासाठी हे हेलियमला अन्य पर्याय उपलब्ध नाही. ५ नॅनोमीटरपेक्षा कमी असलेल्या चिप्समध्ये निर्माण प्रक्रियेत थोडी जरी उष्णता निर्माण झाली तरी उत्पादनात मोठी घट होऊ शकते किंवा उत्पादन पूर्णपणे थांबू शकते. दक्षिण कोरिया मधील चिप उद्योग यामुळे सध्या यामुळे याच संकटात आहे. कारण कोरिया आपल्या गरजेच्या दोन-तृतीयांश हेलियम कतारमधून आयात करतो. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि एसके हायनिक्स सारख्या कंपन्यांनी, ज्या एआय एक्सिलेटरसाठी आवश्यक असलेल्या हाय-बँडविड्थ मेमरी पुरवठ्यात जगात आघाडीवर आहेत, त्यांनी आधीच हेलियम वाचवण्यासाठी पावले उचलायची सुरुवात केली आहे. २०२६ मध्ये यामुळे डिजिटल उपकरणे, विशेषतः मोबाईल हँडसेट, लॅपटॉप, टॅब्लेट सह सैनिकी आणि नागरी उपयोगाची ड्रोन यांच्यासह सध्या बोलबाला असलेलं एआय तंत्रज्ञान यांना कमी उत्पादन आणि वाढलेला खर्च अशा दुहेरी संकटांचा सामना करावा लागेल.
६. अल्युमिनियम टंचाई आणि बियर, सॉफ्ट ड्रिंक, मेडिकल उपकरणे आणि पॅकिंग उद्योग : बहरीन अल्युमिनियम कंपनी अल्बा ही जगातली एक प्रमुख अल्युमिनियम कंपनी आहे आणि जगातली सर्वात मोठी सिंगल साईट स्मेल्टिंग फॅसिलिटी म्हणून ओळखली जाते. इराणी हल्ल्याने या कंपनीने आपली तीन युनिट बंद केल्याने जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आला त्यामुळे बियर आणि सॉफ्ट ड्रिंक कॅनचे दर वाढत आहेत. या पेयांना लागणाऱ्या काचेच्या बाटल्या सुद्धा गॅसच्या कमतरतेमुळे महाग झाल्या आहेत. याचा परिणाम ह्या पेयांची पॅकेजिंग २० ते ४०% महाग होण्यात होणार आहे. शिवाय औषध उद्योगात असलेली सर्जिकल उपकरणे, फॉइल्स आणि अन्नपदार्थ पॅकेजिंग मधील अल्युमिनियम वापराचे दरही महागणार आहेत. याचा एकाच वेळी अनेक उद्योगांवर परिणाम होणार आहे.
पेट्रोल, डिझेलची टंचाई आणि वाढलेले उद्योग हे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीच्या किमतीवर परिणाम करणार आहेत. अजून भारतात म्हणावे तसे दर वाढलेले नाहीत पण लवकरच ते वाढतील. जेट फ्युएल दर वाढणार आहेतच त्यामुळे विमान प्रवास महाग होईल. अन्नधान्य, भाजीपाला, दूध, शिक्षण, रोजगार यात इंधन दरवाढ मोठा परिणाम करणार आहे. प्लास्टिक टंचाई आणि महाग प्लॅस्टिक मुळे पॅकेजिंग महाग होईल याने ईकॉमर्स कंपन्या, तयार अन्नाची होम डिलिव्हरी यांना दणका बसेल. गृहउद्योग, लघु उद्योग यात सर्वाधिक फटका खातील. भारताच्या कानाकोपऱ्यात फोफावलेला घरगुती पर्यटन उद्योग, बांधकाम उद्योग हा सुद्धा मोठ्या संकटात जाईल. यामुळे सामूहिक शहाणपणा आणि खबरदारी याची गरज निर्माण झालेली आहे. सरकारने कोरोना समस्येची आठवण करून देण्याच्या मागे हेच मोठं कारण आहे कारण लांबलेलं युद्ध आपल्याला कदाचित कोरोना विसरायला लावेल इतका काळ आणि त्यापेक्षा मोठ्या अडचणी निर्माण करू शकते!






