Wednesday, March 25, 2026

अशोक खरातने सहा महिने..., आणखी एका तरुणीचा खळबळजनक आरोप

अशोक खरातने सहा महिने..., आणखी एका तरुणीचा खळबळजनक आरोप

नाशिक: महिलांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात लैंगिक शोषणाचा सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका तरुणीने आधी खरातच्या 'ऑफिस बॉय'वर तक्रार केली होती, मात्र आता स्वतः खरातनेच तिचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार तरुणीची अशोक खरातसोबतची ओळख तिच्या कुटुंबाच्या माध्यमातून झाली होती. शेतात घर बांधण्यापूर्वी धार्मिक सल्ला घेण्यासाठी ही तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत खरातकडे गेली होती. याच ओळखीचा फायदा घेत खरातने तिला आपल्या जाळ्यात ओढलं. पीडितेच्या आरोपानुसार, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीत अशोक खरातने तिचं वारंवार लैंगिक शोषण केलं.

या गुन्ह्यात अशोक खरातची गुन्हे करण्याची पद्धत पुन्हा एकदा तीच असल्याचं समोर आलं आहे. इतर पीडितांप्रमाणेच या तरुणीला देखील गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. धार्मिक विधी किंवा सल्ल्याच्या बहाण्याने बोलावून, अमली पदार्थाचा वापर करून महिलांचा फायदा घेतल्याचं याही प्रकरणात घडल्याचं दिसतं.

विशेष म्हणजे पीडित तरुणीनं यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यात अशोक खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. नीरजने तिचे अश्लील फोटो बनवून तिला पाठवले आणि त्रास दिला, असा आरोप तिने केला होता. मात्र, आता तपासात आणि पीडितेच्या नवीन जबाबानुसार, या संपूर्ण प्रकरणामागे अशोक खरातचाच हात असल्याचे समोर आलं असून, खुद्द खरातनेच तिचे शोषण केल्याने तिने आता सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली आहे.

एकापाठोपाठ एक सात गुन्हे दाखल झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. उच्चभ्रू वस्तीत कार्यालये थाटून धार्मिक सल्ल्याच्या नावाखाली चालणाऱ्या या काळ्या कृत्यांचा पोलिसांनी आता कसून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

Comments
Add Comment