मुंबई : मुंबईतील कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेली ही ट्रेन पुन्हा सुरू झाली असली तरी सध्या ती फक्त दिवा स्थानकापर्यंतच धावते. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या कोकणातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पूर्वी ही पॅसेंजर ट्रेन दादर ते रत्नागिरी अशी थेट धावत होती. मात्र रेल्वे प्रशासनाने कोणतेही ठोस कारण न देता तिचा मार्ग कमी करून ती दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित ठेवली. यामुळे प्रवाशांना दादर किंवा मुंबईतील इतर भागातून दिवा येथे जाऊन ही ट्रेन पकडावी लागते, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतो. या पार्श्वभूमीवर मनसेने हा प्रश्न हाती घेतला असून, लवकरात लवकर ट्रेन दादरपर्यंत सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट इशारा दिला की, येत्या १५ ते २० दिवसांत ही मागणी मान्य झाली नाही तर उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रोखण्याचा आंदोलनात्मक मार्ग अवलंबला जाईल. त्यांनी सांगितले की, कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी ही ट्रेन जीवनरेखा आहे आणि त्यांची गैरसोय सहन केली जाणार नाही.
याच मुद्द्यावर मनसेचे आणखी एक नेते नितीन सरदेसाई यांनीही रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, कोकण रेल्वेसाठी स्थानिकांनी आपली जमीन दिली, पण आज त्याच कोकणवासीयांना योग्य सुविधा मिळत नाहीत. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, दादरपर्यंत पॅसेंजर ट्रेन चालवल्यास लोकलच्या वेळापत्रकात अडथळे निर्माण होतात, मात्र हा मुद्दा मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरदेसाई यांनी पुढे सांगितले की, कोकणवासीयांचा सहनशीलपणा गृहित धरू नये. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे, रस्त्यांची परिस्थिती खराब आहे आणि आता रेल्वे सेवेतही मर्यादा आणल्या जात आहेत. सरकार रो-रो सेवा सुरू करण्याच्या घोषणा करते, पण पॅसेंजर ट्रेनसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष का केले जाते, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी काय करत आहेत, हे मुद्दे संसदेत का मांडत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.मनसेने स्पष्ट केले आहे की, कोकणवासीयांच्या हक्कासाठी ते लढा देणार असून, दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल.






