पुणे : इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत. पुढील वर्षात विद्यार्थ्यांना युरोपियन स्पेस सेंटरची भेट देण्याची संधी मिळणार आहे. बेल्जियममधील युरोपियन स्पेस सेंटरला २५ विद्यार्थी पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे यावर्षी परदेशातील अंतराळ संशोधन संस्थांना भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० वर जाणार आहे. जिल्हा परिषदेकडून सध्याच्या शैक्षणिक वर्षात नासा आणि इस्रोला विद्यार्थी पाठविण्याचा पहिल्यांदाच उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आंतरविद्यापीठीय खगोलविज्ञान व खगोलभौतिकीशास्त्र केंद्र (आयुका) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभ्यासक्रम तयार केला होता. या अभ्यासक्रमावर आधारित तीन टप्प्यांची निवड परीक्षा घेण्यात आली.
अंतिम टप्प्यात आयुका येथे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थ्यांना इस्रोच्या भेटीसाठी पाठविले होते, तर २५ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा या संस्थेला भेट देण्याची संधी दिली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या संधीचे राज्यभर कौतुक झाले होते. इतर जिल्ह्यांनीही अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याची तयारी दर्शविली होती.इस्रो, नासा दौऱ्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पालकांनी या दौऱ्याचे कौतुक केले. त्याशिवाय राज्य शासनाने देखील या उपक्रमाची दखल घेतली आहे. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. युरोपियन स्पेस सेंटरसाठी २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. असे पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगतिले .






