Tuesday, March 24, 2026

'गिरगाव चौपाटीवरील जेट्टीचे काम तातडीने पूर्ण करणार'

'गिरगाव चौपाटीवरील जेट्टीचे काम तातडीने पूर्ण करणार'

मुंबई : मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी गिरगाव चौपाटी येथे उभारण्यात येणारे 'पोलीस बोट स्टेशन' (जेट्टी) अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाची आहे, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेत दिली.

आमदार सुनील शिंदे यांनी गिरगाव चौपाटी येथील बोट स्टेशनच्या रखडलेल्या कामाबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. "२६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि सागरी गस्त अधिक प्रभावी करण्यासाठी हे बोट स्टेशन महत्त्वाचे आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असूनही अद्याप हे काम सुरू का झाले नाही? ही जेट्टी नियोजित वेळेत पूर्ण होणार का?" असा सवाल शिंदे यांनी विचारला.

आमदार शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "निधीची तरतूद सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात हा निधी यावर्षी जानेवारी महिन्यात प्राप्त झाला आहे. पोलीस दलासाठी ही जेट्टी अत्यंत महत्त्वाची आहे, मात्र सध्या या कामाची जी गती आहे, त्याबद्दल मी स्वतः समाधानी नाही. त्यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांना हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."

३.७९ कोटींचा प्रकल्प

या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींची माहिती देताना राणे यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात निधी मिळाल्यानंतर तातडीने महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हे काम 'वेस्ट कोस्ट मरीन' कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ३.७९ कोटी रुपये इतकी आहे. मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही जेट्टी महत्त्वाची असल्याने, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड या कामात अधिक लक्ष घालून ते लवकरात लवकर पूर्ण करेल, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो, असे आश्वासनही नितेश राणे यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा